आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, येत्या 48 तासांत वादळी पावसाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने मंगळवारी आगेकूच केली नाही. मान्सून अद्याप अंदमान समुद्रातच थबकला आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या 48 तासांत मराठवाडा व मध्य महाराष्ट्रासह तेलंगणात वादळी पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. दरम्यान, मंगळवारी वादळी पावसात वीज पडून महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मंगळवारी पुणे, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर तसेच कोकणात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपिटीचा मारा मराठवाडा व मध्य महाराष्ट्राने सहन केला आहे. उभी पिके जमीनदोस्त होताना पाहिली आहेत. त्यातच पुन्हा एकदा वेधशाळेने गारपिटीचा इशारा दिला आहे. मंगळवारी नाशिक प्रांतात गारपीट झाली असून येत्या दोन दिवसांत पुन्हा गारपीट होण्याचा संभव आहे, असे आयएमडीने नमूद केले आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेची लाट अद्याप टिकून आहे. चंद्रपूर येथे सलग दुसर्‍या दिवशी देशातील सर्वोच्च तापमानाची 45 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. राज्यातील अन्य प्रमुख शहरात कमाल तापमान असे होते - जळगाव 42.4, औरंगाबाद 41.6, नाशिक 38.5, अमरावती 38.4, अकोला41.5, बुलढाणा 40, परभणी 40.3, बीड 42, नांदेड 44, उस्मानाबाद 40, सोलापूर 41.6, पुणे 39.4, कोल्हापूर 37.3, सांगली 37.8, सातारा 39, महाबळेश्वर 31.5, नागपूर 39.5, वर्धा 40.3, यवतमाळ 39.8.