आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीने कोकण जलमय, दोन दिवसांत कोकणासह मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने हवामान खात्याचे भाकीत खरे ठरवले. आठवड्याच्या अल्पविरामानंतर परतलेल्या पावसाने गेल्या 24 तासात कोकणात अक्षरश: धुमाकूळ घातला. औरंगाबाद जिल्ह्याचा अपवाद वगळता मराठवाड्यातही प्रथमच सर्वदूर दमदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे राज्यातील सर्वाधिक 257 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. विदर्भासह राज्याच्या उर्वरीत भागातही बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.


येत्या दोन दिवसात कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून सक्रीय राहण्यासाठी अनुकूल हवामानस्थिती असून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे.


कोकण, गोवा आणि सह्याद्री रांगांमधल्या गावांना अतिवृष्टीने झोडपले. अनेक गावांत शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसला. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. आतापर्यंत मराठवाड्यावर वक्रदृष्टी ठेवून असलेला पाऊस मंगळवारी पावला. जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने तोंड काढले. काही गावांमध्ये तर पन्नास मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी अनेक गावांमध्ये हलक्या सरींची बरसात झाली. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारÞ्याचे काही तालुके वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला.


पाऊस कशामुळे?
‘समुद्रसपाटीवरचा मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीत आहे. दक्षिण गुजरात ते केरळपर्यंतच्या सागरी किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र अहे. समुद्रावरुन ताशी 45 ते 50 किलोमीटर प्रती तास वेगाने भूभागाकडे वारे वाहू लागले आहेत. या वा-यांबरोबर समुद्रातील बाष्प मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाळी हवामान आहे. मध्य प्रदेश व लगतच्या उत्तर प्रदेशावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेशकडे सरकले आहे. यामुळे विदर्भ-मराठवाड्याकडे पावसाळी ढग खेचले जात आहेत. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून जोरदारपणे सक्रीय झाला आहे,’ असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.


गेल्या 24 तासांतील पाऊस
शहापूर - 106, तळा - 202, रोहा - 210, मुरुड - 242, श्रीवर्धन - 116, चिपळूण - 142, गुहागर - 213, संगमेश्वर - 212, सावंतवाडी - 183, कणकवली - 168, पुणे - 3.2 , महाबळेश्वर - ९3, कोल्हापूर - ७, बार्शी - 21, पंढरपूर - 6.8, नाशिक - 5.६, इगतपुरी - 140, त्र्यंबकेश्वर - 17, जळगाव - 2.9, पैठण - 3.4, सिल्लोड - 5.3, जालना - 14.5, मंठा - 83.2, परतुर - 99, बीड - 19,परळी - 49, माजलगाव - 43.5, लातूर - 37.5, उदगीर - 58.4, उस्मानाबाद - 17.5, कळंब - 24, तुळजापूर - 26, नांदेड - 26.9, भोकर - 52, देगलूर - 46, परभणी - 24, पाथरी - 61, सोनपेठ - 92, हिंगोली - 38, अकोला - 13.3, वाशिम - 14, अमरावती - 5.2, नागपूर - 45.


रायगडमध्ये तिघे वाहून गेले
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 91.13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे कुंडलिका, काळ, सावित्री नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. अलिबाग, मुरूड, रोहा, पोलादपूर व पाली तालुक्यांमध्ये सायंकाळी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यात तीन जण वाहून गेले. मृतांमध्ये एक 14 वर्षीय मुलगा व महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20 घरांचे पूर्णत:, तर 538 घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे 189 कुटुंबे बाधित झाली आहेत. बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईचे वाटप सुरू आहे.