आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rainfall Warning In Next 48 Hours In Maharashtra

48 तासांत मध्‍य महाराष्‍ट्राला पुन्‍हा मुसळधार पावसाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यभरात पावसाची संततधार सलग चौथ्या दिवशीही सुरू असली, तरी बुधवारी त्याचा जोर काहीसा मंदावला होता. मात्र कोकण-गोवा-मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येत्या 48 तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

समुद्रसपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून केरळकिनार्‍यापर्यंत पसरला आहे. उत्तरप्रदेश व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र आता मध्यप्रदेश व छत्तीसगड भागांवर आहे. तसेच बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिम भागात नव्याने कमी दाबाचा पट्टी सक्रीय होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आगामी तीन दिवस वरुणराजाचा मुक्काम राज्यात राहणार, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी पडल्या.

‘उजनी’ शून्यातून बाहेर, साठा 1.86 टक्के
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणातून 12 हजार तर पवना धरणातून 7150 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुळा आणि पवना नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराच्या चौथर्‍यापर्यंत पाणी पोचले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील इतर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा आता उणेवरून 1.86 टक्क्यांवर आला आहे.


विदर्भात अतिवृष्टीचे संकट कायम

पूर्व विदर्भात पुराने थैमान घातलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असली तरी संकट कायम आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने संकट कायम आहे.

नागपुरात मंगळवार दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी किरकोळ सरी येत राहिल्या. गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा जोरा होता. मात्र, बुधवारी उघाड दिल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. सिरोंचा गावातीस 25 घरांना पुराने वेढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.

चंद्रपूर जिल्ह्यासही बुधवारी पूरपरिस्थितीतून दिलासा मिळाला. इरई धरणाचे तीन दरवाजे अद्यापही एक मीटरने उघडण्यात आले आहेत. येथील औष्णिक वीज केंद्रात 19 जुलै रोजी पाणी शिरल्याने 500 मेगावॉटचे तीन संच बंद करावे लागले. सध्या 210 मेगावॉटच्या तीन संचातून 230 मेगावॅट निर्मिती सुरु आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे 19 बळी

यवतमाळ । दीड महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 19 जणांचे बळी गेले. शेकडो घरांची पडझड झाली. तर हजारो एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत 113 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 1986 कुटुंबीय बाधित झाले आहे. याशिवाय पुरामध्ये 20 जनावरे वाहून गेली आहेत. पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 9 हजार 446 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.