आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rains, Cyclonic Storm Wreak Havoc In Maharashtra News In Marathi

उन्हाळ्यात पावसाळा : राज्यभरात वादळी पाऊस, गारपिटीने पिके आडवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील बहुतांश भागाला गेल्या तीन दिवसांपासून वादळी वारे व गारपिटीचा तडाखा बसत आहे. बुधवारही मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले. यात हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

पुढील दोन दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ हवामान कायम राहणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगड व नजिकच्या परिसरात चक्राकार वारे वाहात आहेत. अफगाणिस्तानची ईशान्य सीमा आणि नजीकच्या पाकिस्तानी प्रदेशातही चक्राकार वारे वाहात आहेत. दक्षिणेला लक्षद्वीप, मालदीवपासून कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. उत्तर आणि दक्षिण दिशांना झालेल्या या हवामानबदलांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या भूभागावर समुद्रावरुन येणारे वारे बाष्प घेऊन येत आहेत. यामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

ढगाळ हवामानामुळे थंडी पळाली आहे. गेल्या चोवीस तासात नगर येथे 13.8 अंश सेल्सिअस इतके राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. .

धुळ्यात तडाखा
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारपीट होत आहे. बुधवारी (दि.26) दुपारी पुन्हा तालुक्यात अनेक ठिकाणी सुमारे अर्धा तास गारपीट झाली. त्यांचा फटका शेतीपिकांना बसला.

सोलापूरातही नुकसान
बारामती, दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्टय़ात बुधवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोलापूर जिल्हय़ातील माळशिरस व सांगोला या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 17 मिमी पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्हय़ात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. रोहण्यानजीक मोठे वृक्ष मार्गावर उन्मळून पडल्याने सायंकाळ दरम्यान बुलडाणा-खामगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबादेत अर्ध्या तासात 14.2 मि.मी.
बुधवारी सायंकाळी औरंगाबाद शहरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट झाली. राज्यात अनेक जिल्ह्यांनाही पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. शहरात अर्ध्या तासात 14.2 मि.मी. पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले, घरांवरील पत्रे उडाले. त्यातच तीन तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला.

मराठवाड्यात 2 बळी, राज्यात थैमान
जालना, हिंगोली, उस्मानाबादेत बुधवारी अवकाळी पाऊस पडला. जालना जिल्ह्यात अंगावर झाड कोसळून महिलेचा, तर परंडा तालुक्यात युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. राज्याच्या इतर भागातही वादळी वारे व गारपिटीने थैमान घातले.

कारण काय?
हिंद महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान वाढून अनपेक्षित बदल झाल्याने राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस पडत आहे.