आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण महाराष्ट्र चिंब, मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, सतर्कतेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामानस्थितीमुळे सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार आषाढसरींनी हजेरी लावली. कोकण, विदर्भ आणि सह्याद्री डोंगररांगेतील अनेक गावे अतिवृष्टीने जलमय झाली आहेत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुलनेने पावसाचा जोर कमी होता. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी दादर, हिंद माता, परळ, एलफिन्‍स्‍टन पुल इत्‍यादी ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही धीम्‍या गतीने सुरु आहे. तिन्‍ही मार्गावरील लोकल्‍स सुमारे 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. आज मुंबईत मोठी भरती येणार असून 4.95 मीटर उंचीच्‍या लाटा उसळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी येथे विक्रमी 333 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे तब्बल 274 आणि रायगडजवळच्या दावडी येथे 210 मिलिमीटर पाऊस कोसळला. कोकणातल्या ९ आणि विदर्भातल्या 12 तालुक्यांमध्ये पावसाने 24 तासांत शंभर मिलिमीटरचा आकडा ओलांडला. कोकण-विदर्भातील नद्या आणि धरणे ओसंडून वाहू लागली आहेत.

मराठवाड्यात 16 टक्के साठा
संततधार पावसामुळे राज्यातल्या लहान, मोठ्या, मध्यम अशा सर्व धरणांमधला एकत्रित पाणीसाठा 51 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी 23 जुलैला हा धरणसाठा फक्त 22 टक्के होता. अर्थात कोकण आणि विदर्भातील मुसळधार पावसामुळे राज्याची आकडेवारी दिलासादायक दिसत आहे.
कोकणातील धरणे 79 टक्के तर नागपूर विभागातली धरणे 74 टक्के भरली आहेत. मराठवाड्यातील धरणांमधील जलसाठा 16 टक्के इतका सर्वात कमी आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये 26 टक्के अणि पुणे विभागातल्या धरणांमध्ये 56 टक्के पाणीसाठा झाला आहे.

खडकवासलातून विसर्ग वाढला


पुणे । पुणे विभागातील पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या धरणांतून सोमवारपासून सुरू केलेला विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणांतून 4866 क्युसेक्स, मुळशीतून 5300 क्युसेक्स, पवनामधून 4952 क्युसेक्स तर चासकमानमधून 4440 क्युसेक्सविसर्ग सुरू आहे. पवना आणि मुळशी धरणे 90 टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. त्यामुळे या धरणांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.


पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे

कोल्हापूर । जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातही पाण्याची पातळी वाढली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून त्याचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून यातून 7000 क्युसेक्स तर वीजगृहातून 2200 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
झाली आहे.