आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंदच, दरडी कोसळण्याची भीती कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा घाटात बोगद्याजवळ कोसळलेली दरड... - Divya Marathi
खंडाळा घाटात बोगद्याजवळ कोसळलेली दरड...
पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, या दरडीमुळे कोसळलेले दगड काढण्याचे काम सोमवारी सायंकाळीच पूर्ण झाले आहे. मात्र, लोणावळा-खंडाळ्यात मागील पाच-सहा दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय आयआरबी व पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, सह्याद्रीच्या रांगेत असणा-या महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी भोर येथील मांढरदेवी घाटात दरड कोसळली होती. आज पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कल्याणमार्गे नगरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पुण्यातील कात्रजवळील शिंदेवाडी येथे दरड कोसळली आहे. तेथून एकेरी वाहूतूक सुरु आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात बोगद्याजवळ सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर मुंबईकडे वाहतूक ठप्प झाली होती. लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने घाटातील दरडप्रवण क्षेत्रातील डोंगरावरील दगड ठिसूळ होऊन माती, दगड खाली घसरण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सुमारे दोन तास वाहनांच्या सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी दहाच्या सुमारास ही दरड कोसळल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास दरड बाजूला काढण्याचे काम सुरु झाले. आयआरबी कंपनीने पोलिस यंत्रणांच्या मदतीने वाहतूक बंद केल्यानंतर पोकलंड व जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरु होते. मात्र, हे काम सायंकाळपर्यंत सुरुच होते. लोणावळ्यात सोमवारीही जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे दरडी कोसळलेल्या भागातून आणखी दगड खाली येण्याची भीती होती. त्यामुळे पोकलंड व जेसीबीचे चालक सावध व सुरक्षितपणे काम करीत होते. त्यामुळे दोन-तीन तासाच्या कामाला आयआरबी कंपनीला सायंकाळी 7 पर्यंत काम करावे लागले.
दरम्यान, सध्या द्रुतगती मार्गावरील सर्व दरी बाजूला करून लेन मोकळ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, दरडी कोसळण्याची भीती कायम आहे. त्यामुळेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या वाहतुकीसाठी आज बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईकडे जाणारी वाहने जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आहेत. तसेच द्रुतगती महामार्गावरील पुणे मार्गावरील एक लेन मुंबईला जाणा-या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोणावळा-खंडाळा घाट परिसरात 2005 आणि 2008 मध्ये अशा प्रकारच्या दरडी कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत घाटातील आठ ते दहा किलोमीटरच्या दरडप्रवण क्षेत्रात 26 हजार चौरस मीटर लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. या जाळीमुळे छोटे-मोठे दगड अडत होते. आजच्या सारखी मोठी दरड कोसळण्याचा प्रकार या काळात झाला नव्हता, मात्र आजच्या दुर्घटनेमुळे या लोखंडी जाळ्या देखील कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरडी कोसळणे थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधून काढण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रातील अभियंत्यांपुढे उभे राहिले आहे.
पुढे पाहा, या संबंधित छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...