आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Educated Advocates Use Abusing Words On Drama In Pune

‘सुसंस्कृत’ पुण्यामध्ये उच्चशिक्षित वकिलांचीच टगेगिरी, शेरेबाजीमुळे नाटकाचा विचका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चर्चेतील नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांच्या अयोग्य शेरेबाजीमुळे थांबवावा लागण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री पुण्यात घडला. नाटकातील प्रमुख कलाकारांनीच हा प्रकार फेसबुकच्या माध्यमातून उघड केल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
‘पुणे बार कौन्सिलने वकील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी टिळक स्मारक मंदिर नाट्यगृहात शुक्रवारी ‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाचा प्रयोग ठेवला होता. मात्र नाटक सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांतून वाईट शब्दांत शेरेबाजी सुरू झाली. प्रमुख नट चिन्मय मांडलेकर व मधुरा वेलणकर यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. पण नटांना आपसातील संवादही ऐकू येईनासे झाल्यावर नाटक थांबवावे लागले, असे प्रमुख कलाकारांनी सांगितले.

माध्यमांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली कसा बाजार मांडला, याचे विदारक दर्शन या नाटकात घडते. आर्थिक गरजेपोटी एक नट स्वत:च्या आयुष्यातील खासगी गोष्टीचे चित्रीकरण करण्यास अनुमती देतो आणि त्यातून अखेर काय निष्पन्न होते, याची सुन्न करणारी गोष्ट हे नाटक सांगते.

प्रयोग पुणे बार कौन्सिलने घेतला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सर्व वकील, न्यायाधीश तसेच त्यांचे कुटुंबीय होते. नाटक सुरू असताना पूर्ण वेळ प्रेक्षकांमधून वाईट पद्धतीने शेरेबाजी केली जात होती. सुरवातीला आम्ही दुर्लक्ष केले. पण नंतर प्रयोग पुढे सुरू ठेवणे अशक्य झाल्यावर मी आणि मधुरा दोघांनीही प्रयोग काही वेळासाठी थांबवला आणि प्रेक्षकांशी सरळ संवाद साधला. ‘तुम्हाला नाटक पहायचे आहे की नाही? असली शेरेबाजी सुरू राहिली तर आम्हाला प्रयोग करणे शक्य नाही’ असे स्पष्ट विचारल्यावर प्रयोग पुढे पार पडला, असे नाटकाचा प्रमुख अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी सांगितले.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेली शेरेबाजी संतापजनक होती. तरीही आम्ही प्रयोग पूर्ण केला. नाटकाचा विषय अतिशय संवेदनशील असल्याने प्रयोग मध्ये थांबवून आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधला. बार कौन्सिलसारख्या संस्थेने घेतलेल्या प्रयोगात असे घडावे, याचे वाईट वाटते. शेरेबाजी करणारे चार-पाच प्रेक्षक वगळता अन्य प्रेक्षकांना प्रयोग हवा होता, पण उर्वरीत शेकडो प्रेक्षकांनी शेरेबाजी सहन केली. ती करणा-यांना बाहेर जायला सांगण्याचे धैर्य कुणीही दाखवले नाही, याचे अधिक वाईट वाटले, असे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी सांगितले.
असा आहे नाटकाचा आशय
माध्यमांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली कशा पद्धतीचा बाजार मांडला आहे, याचे विदारक दर्शन या नाटकात घडते. आर्थिक गरजेपोटी एक नट स्वत:च्या आयुष्यातील खासगी गोष्टीचे चित्रीकरण करण्यास अनुमती देतो आणि त्यातून अखेर काय निष्पन्न होते, याची सुन्न करणारी गोष्ट हे नाटक सांगते.

असे काही घडलेच नाही
सभासद व कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या ‘मिस्टर अँड मिसेस’ या नाट्यप्रयोगादरम्यान कुठलीही अश्लील शेरेबाजी झालेली नाही. कुणीही अयोग्य भाषेत कॉमेंट केली नाही. कलाकारांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हे सगळे केले आहे. असोसिएशनची बाजू लवकरच मांडणार आहोत.
-ढगे पाटील – पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष

हा कुठला सुसंस्कृतपणा?
‘मिस्टर अँड मिसेस’च्या प्रयोगात घडलेल्या प्रकाराने मी अस्वस्थ आहे. शिक्षण आणि सुसंस्कृतपणा यांचा काही संबंध असतोच असे नाही, हेही जाणवले. तथाकथित सुशिक्षित प्रेक्षक असतानाही हे घडले, याचा खेद वाटतो.
- चिन्मय मांडलेकर, अभिनेता