आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाने फिरणारा घरफोड्या गजाआड; हायटेक भामट्यावर 40 गुन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश व कर्नाटक अशा विविध राज्यांत घरफोडी करण्यासाठी एक चोरटा चक्क विमानाने प्रवास करत असे. चोरीसाठी अत्याधुनिक साहित्याचा वापर व अलिशान लान्सर गाडी वापरणार्‍या या हायटेक भामट्याने 40 गुन्ह्यांत तीन कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

मुन्ना ऊर्फ समील अलीहुसेन खान ऊर्फ कुरेशी (वय 39, रा. मुंबई व हैदराबाद), त्याचा साथीदार सुरेश मिठालाल सोनी (39, रा.राजस्थान) यांना नुकतीच अटक करण्यात आली. त्याच्याजवळून 20 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

एखादा उच्चपदस्थ अधिकारी किंवा उद्योजकाप्रमाणे राहणीमान ठेवणारा मुन्ना घरफोडी करण्यासाठीही लान्सर गाडीचा वापर करत असे. त्यामुळे साहजिकच कोणत्याही सोसायटीच्या गेटवर वॉचमनकडून त्याची अडवणुक होत नसे. याचा गैरफायदा घेत तो आपले काम फत्ते करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरोधात पुणे, मुंबई, नाशिक, नागपुर, हैदराबाद, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद, जयपुर आदी ठिकाणीचे 100 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे आहेत. त्याने केलेले 40 गुन्हे उघडकीस आले असून यापैकी प्रत्येक घरातील चोरी किमान 10 लाखांच्या पुढे होती. चोरलेले सोने गहाण ठेवून त्यावर तो पैसे मिळवत होता.

खबर्‍यामार्फत सापडला
सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांचे पथक मागील पाच महिन्यापासून त्याच्या मागावर होते. त्याची आई मुंबईत गोवंडी याठिकाणी राहात असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तिथे खबर्‍यांचे जाळे निर्माण केले. मुन्ना हा देवनार कत्तलखाना येथे येणार असल्याची माहिती यातूनच पोलिसांना मिळाली व सापळा रचून त्याला अटक केली.

यापूर्वीही पुण्यात जेरबंद, अडीच कोटींचा माल जप्त
आरोपी मुन्नाला 2008 व 2011 मध्येही घरफोडीच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळी त्याच्याकडून 65 घरफोडीतील अडीच कोटीचा माल जप्त करण्यात आला होता.