आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himayat Baig Convicted In German Bakery Bomb Blast Case

जर्मन बेकरी बॉम्‍बस्‍फोटः हिमायत बेग दोषी, 18 एप्रिलला शिक्षेची सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्‍यातील जर्मन बेकरी बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी सत्र न्‍यायालयाने हिमायत बेगला दोषी ठरविले आहे. याप्रकरणी आज न्‍यायालयाने निकाल दिला आहे. जर्मन बेकरीमध्‍ये 2010 मध्‍ये बॉम्‍बस्‍फोट झाला होता. त्‍यात 17 जणांचा बळी गेला होता.

120बी 302, 307, 434, 474, या कलमांतर्गत हिमायत बेगला दोषी ठरविण्‍यात आले आहे. 18 तारखेला शिक्षा सुनावण्‍यात येणार आहे. शिक्षेबाबत बाजू मांडण्‍यासाठी हिमायत बेगला मुदत देण्‍यात आली आहे. बेगवर सिद्ध झालेल्‍या 5 गुन्‍ह्यांमध्‍ये मृत्‍यूदंडाचीही तरतूद आहे. या खटल्‍याच्‍या सुनावणीदरम्‍यान 85 जणांच्‍या साक्षी नोंदविण्‍यात आल्‍या.

हिमायत बेगला पेरुगेटजवळून 2010 मध्‍ये अटक करण्‍यात आली होती. हिमायत बेग हा मुळचा बीडचा रहिवासी आहे.

बचाव पक्षाने निकालाविरोधात उच्‍च न्‍यायालयात अपील करणार असल्‍याचे सांगितले. कट लंकेत शिजला असे पोलिसांचे म्‍हणणे आहे. परंतु, लंकेत जाऊन कोणत्‍याही पोलिसाने तपास केलेला नाही, असे बचाव पक्षाचे म्‍हणणे आहे. फैयाज कागझी आणि मोहम्‍मद आसिफ यांच्‍यासोबत कट रचल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे. परंतु, हे दोघेही फरार आहे. हिमायत बेग कधीही जर्मन बेकरीत गेला नाही. त्‍याने बॉम्‍बही ठेवलेला नाही. हा प्रकार म्‍हणजे चोराला सोडून सन्‍याशाला फाशी देण्‍यासारखाच आहे, असे बचाव पक्षाने प्रतिक्रीया देताना म्‍हटले.


अतिरिक्त सत्र विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी आज निकाल दिला. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी बॉबस्फोट घडवला होता. यात 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 56 जण जखमी झाले होते. मृतांमध्‍ये 5 परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या परिसरात विदेशी नागरिकांचा अधिक वावर असल्याचे ध्यानात ठेवूनच जर्मन बेकरीला लक्ष्य करण्यात आले होते, हे तपासाअंती स्पष्ट झाले होते. एटीएसने स्फोटाचे तपासकार्य युद्धपातळीवर राबवून न्यायालयीन प्रक्रियेला गती दिली. त्यामुळे सव्वातीन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत स्फोटाचा निकाल लागला आहे.