आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायत बेग न्‍यायाधीशांना म्‍हणतो मी 18 वा \'बळी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जर्मन बेकरी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 17 निष्पाप लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, माझा या स्फोटाशी कोणताही संबंध नसून मी निरपराध आहे. मला न्याय न मिळाल्यास या निष्पापांप्रमाणे माझाही अठरावा ‘बळी’ ठरेल, असे सांगत या स्फोटातील प्रमुख आरोपी मिर्झा हिमायत बेग याने गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात नक्राश्रू काढले.

शिक्षा सुनावण्यापूर्वी आपली बाजू मांडताना बेग म्हणाला, मी अल्लास मानणारा असून खोटे बोलणार नाही. मी एका गरीब कुटुंबातील आहे, स्फोटाशी माझा कसलाही संबंध नाही. आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून शिक्षक बनण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी परतलो व आपला समाज थोडा मागासलेला असल्याने त्यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. 31 जानेवारी 2010 रोजी एका आरक्षणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात आलो, पण त्या ठिकाणाहून कोठेही गेलो नाही. 2010 पासून मी फरार असल्याचे आरोप केले जात. मात्र, मी कुठेही पळालो नव्हतो, घरीच होतो.

म्हणे न्यायव्यवस्थेवर विश्वास
भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायव्यवस्था वेळप्रसंगी शंभर अपराध्यांची सुटका करेल, पण एका निष्पापास बळी ठरवणार नाही. माझ्यावर एवढा अन्याय झाला, पण तरीही सत्य समोर येईल, असा मला विश्वास वाटतो. त्यावर न्यायालयाने विचार करून मला दया दाखवावी, अशा भावना व्यक्त करणारे आपले दोनपानी लेखी मतही बेगने न्यायालयात सादर केले.

‘एटीएस’ने मला अडकवले
बेग म्हणाला, माझ्या घरी कोणतीही आरडीएक्स स्फोटके सापडली नसून मी कधी दारूगोळा, आरडीएक्स पाहिलेही नाही. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया, पोलिस निरीक्षक दिनेश कदम यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचले व त्यास पुणे एटीएसचे विनोद सातव यांच्या पथकाने साथ दिली. मी निर्दोष आहे हे तपास यंत्रणांना माहीत आहे, पण खरा अपराधी मिळत नसल्यामळे ते सर्वजण तोंडावर बोट ठेवून आहेत.

न्यायालयात जंबो फौजफाटा
बंगलोर येथे बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्वर्भूमीवर व जर्मन बेकरी खटल्याच्या निकालाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी बुधवारी रात्रीपासूनच पुण्याच्या न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. एक डीसीपी, एक एसीपी, 10 पीआय, 17 एपीआय व पीएसआय, गुन्हे शाखा, एटीएसचे 200 पोलिस कर्मचारी (40 महिला पोलिस), वाहतूक शाखेचे एक पोलिस निरीक्षक व 10 कर्मचारी, शीघ्र कृती दलाची एक तुकडी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, राखीव कृती दलाची एक तुकडी व बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती न्यायालयातील पोलिस चौकीचे निरीक्षक पांडुरंग सहाणे यांनी दिली.

कोर्टात ढसाढसा रडला
गुरुवारी सकाळी बेग न्यायालयात आल्यावर त्यास सुनावणीच्या कक्षात मागील बाकड्यावर बसवण्यात आले. न्यायाधीश धोटे न्यायालयात आल्यावर त्यांनी बेगला साक्षीदाराच्या पिंजºयात येऊन मत मांडण्यास सांगितले. बेगने आपले मत लेखी स्वरूपात आणले होते त्याचे वाचन कर असे न्यायाधीशांनी सांगितले. त्या वेळी समोर मृत्यू दिसत असल्याने बेगने रडत रडत आपले म्हणणे मांडले.