आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन, पुण्यात आज हाेणार अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवचरित्र, मराठेशाही आणि जगभरातील दुर्गसंपदा यांचे गाढे अभ्यासक, लेखक आणि लोकप्रिय व्याख्याते निनाद गंगाधर बेडेकर (६५) यांचे रविवारी पहाटे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक कन्या, पुत्र असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बेडेकर यांना पुण्यातील रत्ना मेमोरियल रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. किडनीचे कार्य बिघडल्याने तसेच प्रकृतीत अचानक गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तेथेच पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बेडेकर यांच्या कन्या नियती अमेरिकेत असतात. त्या परतल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

बेडेकर यांच्या मातोश्री सरदार रास्ते कुटुंबातील होत्या. स्वातंत्र्यसैनिक तसेच स्त्रियांसाठी कार्य करणा-या म्हणून त्या परिचित होत्या. इतिहासाची गोडी त्यांच्याकडून बेडेकरांना मिळाली. १७ ऑगस्ट १९४९ या दिवशी निनाद बेडेकरांचा जन्म झाला. ते ऑटोमोबाइल इंजिनिअर होते. किर्लोस्कर कंपनीत व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. नोकरीच्या निमित्ताने ते राज्यात, देशात तसेच विदेशांत सर्वत्र फिरले. इतिहासाचे मूळचे प्रेम या प्रवासातूनही जोपासले गेले. अभ्यासू वृत्ती, प्रतिभा, नव्याचा डोळस स्वीकार आणि विश्लेषणात्मक व चिकित्सक विचारपद्धती यातून बेडेकरांचे कर्तृत्व बहरत गेले.

इतिहासाविषयी त्यांना आंधळे वा भाबडे प्रेम नव्हते. अत्यंत तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ पद्धतीने बेडेकरांनी इतिहासाकडे, शिवचरित्राकडे तसेच मराठेशाहीच्या कारभाराकडे पाहिले आणि त्यानंतरच आपले विचार त्यांनी लेखनातून, व्याख्यानांतून प्रभावीपणे मांडले. देश-विदेशात बेडेकरांनी साडेपाच हजारंाहून अधिक व्याख्याने मराठी, हिंदी व इंग्रजीतून दिली. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच संस्कृत, मोडी, फार्सी, पर्शियन व पाली-प्राकृतचाही व्यासंग केला. कवी भूषण हा बेडेकरांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्याचे संपूर्ण काव्य बेडेकरांना मुखोद्गत होते.

साठीनिमित्त केले ६१ किल्ले सर
बेडेकरांनी त्यांच्या २००९ मध्ये झालेल्या षष्ट्यब्दीनिमित्त देशातले ६१ किल्ले चढण्याचा संकल्प केला आणि युवा मित्रांना सोबत घेऊन तो पूर्णत्वासही नेला. महाराष्ट्रातील सुमारे साडेतीनशे किल्ल्यांचा इतिहास, बांधणी, भौगोलिक व सामरिक महत्त्व यावर बेडेकर अतिशय अधिकारवाणीने बोलत आणि ऐकणा-यांना मंत्रमुग्ध करत.