आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयच उचलते मुलीच्या जन्माचा खर्च, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याच्या हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयाने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे. एखादी मुलगी जन्माला आल्यास रुग्णालय प्रसूतीचा खर्च घेत नाही. बाळंतपण नाॅर्मल होवो की शस्त्रक्रिया, संपूर्ण खर्च माफ केला जातो.
बाळाची तब्येत बरी नसल्यास, आयसीयूत ठेवावे लागणार असल्यास किंवा बाहेरच्या डाॅक्टरांची मदत घ्यायची असेल तरी त्याचा खर्चही हे रुग्णालयच करते. रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. गणेश राख म्हणतात, मुलगी जन्माला आल्यास मी भाग्याचे समजतो. २०१२ पासून हा संकल्प केला असून आजवर आमच्या रुग्णालयात ४३४ मुलींनी जन्म घेतला आहे.

उपक्रमाबाबत डाॅ. राख सांगतात, आम्ही सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वंजारवाडीचे. वडील आदिनाथ हमाली करायचे, तर आई सिंधू मोलमजुरी. आम्ही तिघे भावंडे. डाॅक्टर होण्याचे माझे स्वप्न होते. अनेक किमी सायकलने घरोघरी जाऊन मी उपचार करायचो. एमबीबीएस झाल्यावर लग्न झाले. पुढे मुलगी तनीषा झाली. आता ती ९ वर्षांची आहे. पत्नी तृप्तीसोबत तीही या उपक्रमात मला मदत करते. पुढे २००७ मध्ये थोडा पैसा हाती आला.

पुण्यात मेडिकेअर हॉस्पिटल फाउंडेशन नावाने दोन खाटांचे रुग्णालय सुरू केले. याच काळात एक घटना घडली. मुलगी जन्मल्यास खर्च कोणी करायचा यावर दोन कुटुंबांत वाद सुरू होता. प्रकरण हातघाईवर आले. त्याच वेळी मी मुलगी जन्माला येणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला. अनेकांनी मला रोखले. असे केल्यास रुग्णालय बंद पडेल, असेही ते म्हणाले. पण मुलींचे भाग्य बघा, आज माझे रुग्णालय ५० खाटांचे झाले आहे. मुलीच्या जन्माने पूर्ण रुग्णालय आनंदित होते. मिठाई वाटून मातेच्या हाताने केक कापतो. मुलीची आई झालेल्या महिलेचा सन्मान केला जातो. प्रसूतीच्या माध्यमातून रुग्णालये कोट्यवधींची कमाई करतात. पण मुलगी जन्माला आल्यास मला मिळतो तो आनंद अनमोल आहे, असे डाॅ. राख म्हणतात.

आम्हीही हेच करू, देशात ४ हजार डाॅक्टरांचा निर्धार
देशातील खासगी रुग्णालयांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे मला वाटते. मुलगी जन्मल्यास प्रसूती खर्च, औषधे त्यांनी मोफत द्यावीत. अनेक रुग्णालये, डाॅक्टरांशी मी बोललो आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे ४ हजार डाॅक्टरांनी तशी तयारी दाखवली. - डॉ. गणेश राख