आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Denies Responsibility Of Cancer Effected Wife

कॅन्सरग्रस्त पत्नीची जबाबदारी नको, सांभाळण्यास नकार देणा-या पतीविरोधात खटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विवाहानंतर पती-पत्नी आयुष्यात येणा-या सुख-दु:खाच्या प्रसंगांना एकत्र सामोरे जाण्याच्या आणाभाका घेतात. मात्र, पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबात लग्न झालेल्या विवाहितेला एक वर्षाने अचानक कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिने याबाबत पतीला माहिती दिली. मात्र, कॅन्सर झाल्याचे समजताच पतीने पत्नीला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे तिने पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे.

रेश्मा व अनिल (नावे बदललेली आहेत) हे दोघेही सिव्हिल इंजिनिअर झालेले पुण्यातील जोडपे. लग्नापूर्वी अनिलने रेश्माला करिअर करण्याची परवानगी देत पारंपरिक पद्धतीने एप्रिल 2012 मध्ये धूमधडाक्यात पुण्यात लग्न केले. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले. मात्र, त्यानंतर तिला नोकरी करण्यास पतीने विरोध केला. आजारी पडल्यानंतरही तिला रुग्णालयात न नेता घरगुती उपचार केले जात होते. मात्र, अचानक एक दिवशी खोकल्याने आजारी पडल्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली असता तिला त्यांनी बायोप्सी चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने बायोप्सी चाचणी केली असता तिला कॅन्सर (हॉडगीकन्स लायमफोमा) झाल्याचे स्पष्ट झाले. ही बाब अनिलला कळताच त्याने पत्नीला औषधोपचाराचा खर्च नाकारत घरातून बाहेर काढले. त्यानंतर ती माहेरी गेली. त्यानंतर त्याने तिला तिस-याच दिवशी घटस्फोटासाठी नोटीस पाठवली. रेश्मा सध्या पुण्यातील एका रुग्णालयात केमोथेरपी व रेडिओथेरपीचे उपचार घेत असून दुसरीकडे पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा लढा देत आहे.

पतीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
रेश्माच्या वकील सुप्रिया कोठारी यांनी सांगितले की, अनिलकडून रेश्माला तिचा कायदेशीर हक्क मिळावा तसेच तिचा औषधोपचाराचा खर्च, व लग्नातील तिचे दागिने मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एल.पाठक यांच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने रेश्माचा पती व सासूविरोधात नोटीसा काढल्या असून पतीला पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.