आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Son Of Bharatmata, Tibet Supreme Spiritual Leader Dalai Lama Say

मी भारतमातेचा पुत्रच, तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांची भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘मी अगदी बालपणापासून प्राचीन भारताविषयी ऐकत आलो आहे. येथील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांची ख्याती मला ज्ञात आहे. काळ बदलला असला तरी आजही मला भारत ही ज्ञानसाधकांची भूमी वाटते आणि मी स्वत:ला भारताचा पुत्रच मानतो,’ अशा शब्दांत तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी रविवारी आपल्या भारताविषयीच्या भावना व्यक्त केल्या.


निमित्त होते ज्येष्ठ विचारवंत दादा वासवानी यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याचे.. दलाई लामा यांच्या उपस्थितीत रविवारी या सोहळ्याचे झाले. तेव्हा अभिनेता आमिर खान याने या दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. दलाई लामा म्हणाले, ‘आजकालच्या तरुणाईला जगातल्या धर्मगुरूंनी योग्य ती दिशा देण्याची, मार्गदर्शन करण्याची अतोनात गरज आहे. अन्यथा तरुणाई भरकटत जाण्याची शक्यता आहे.’


दादा वासवानी यांना आमिरने विविध प्रश्न विचारले. ‘तुमच्या मते सुख म्हणजे काय, अचीव्हमेंट काय वाटते, तुमच्याकडे लोक विविध हेतूंनी येतात, तुम्ही उच्चशिक्षित असून या दिशेने कसे आलात?’.. या सर्व प्रश्नांवर ‘गुरूंचे मार्गदर्शन आणि सर्वांविषयी प्रेम’, एवढेच समर्पक उत्तर दादांनी दिले. ‘मी उच्चशिक्षित आहे, अध्यापनही करत होतो, पण गुरूंची भेट झाली आणि दिशा बदलली. भगवद्गीता हे माझे आवडते पुस्तक आहे. कुणी मला कुठल्याही हेतूंनी भेटायला आले तरी मी प्रत्येकाला प्रेमाने, विश्वासानेच भेटतो,’ असेही त्यांनी सांगितले.


राजकारणात रस नाही
देशाच्या राजकीय चित्राविषयी दादा वासवानी म्हणाले, ‘ मला राजकारणात कुठलाही रस नाही. पण देशाच्या कल्याणासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी, समाजधुरीणांनी एकत्रित येऊन काम करावे असे मात्र वाटते.’


आमिरची क्रेझ
वासवानी मिशनचा परिसर तरुणाईने खच्चून भरला होता. ग्रे टी शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलेल्या आमिरची एक छबी टिपण्यासाठी मोबाइलचा क्लिकक्लिकाट सुरू होता.