आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Like Uddhav Thakare Become Chief Minister Of Maharashtra Ramdas Athwale

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मला आवडेल - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मला आवडेल,’असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.विधानसभेच्या 171 जागा शिवसेना, तर 117 जागा भाजप लढवते. त्यामुळे साहजिकच शिवसेनेच्या अधिक जागा निवडून येतात. त्यामुळेच महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदासाठीची पसंती उद्धव ठाकरे यांना असेल. भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या तर गोपीनाथ मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे आठवले म्हणाले.
भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीच्या मित्रपक्षांची संख्या वाढू लागली आहे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा पक्ष सोबत आल्याने महायुतीची ताकद वाढलीय. विधानसभेसाठी ‘रिपाइं’ला 30 जागा सोडण्याची आमची मागणी आहे. इतर मित्रपक्षांनाही जागा द्याव्या लागतील. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता नाही. कारण भाजप-शिवसेनेची पंचवीस वर्षांपासून युती आहे. ‘ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री’ हे त्यांचे सूत्र ठरलेले आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
मुंडे राज्यात येणार नाहीत
गोपीनाथ मुंडे खासदारकीची निवडणूक लढवत असल्याने ते राज्यात परत येतील असे वाटत नाही. केंद्रात रालोआचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंडे केंद्रातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी जास्त उत्सुक असतील, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. ‘भाजपच्या कोट्यातून मला राज्यसभेवर पाठवले जाणार आहे, मात्र महाराष्ट्रातून पाठवायचे की, मध्य प्रदेशातून याचा निर्णय भाजप लवकरच घेईल. राज्यसभेवर गेल्यानंतर राज्यभर प्रचारासाठी मला वेळ मिळेल,’ असे ते म्हणाले.