आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू असल्याचा मलाही अभिमानच ! राहुल बजाज यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'सत्तेत आल्यापासून ' या लोकांनी गेल्या तीन-चार महिन्यांत ज्या हिंदुत्वाची चर्चा चालवलीय ते हिंदुत्व माझ्या ओळखीचे नाही. ‘त्यांचे' हिंदुत्व माझ्या समजण्याच्यापलीकडचे. गोडसे स्तुती वगैरे मला कळत नाही. मात्र मी भोंदू सेक्युलर मुळीच नाही. हिंदू असल्याचा मला पूर्ण अभिमान आहे,’ असे ठाम प्रतिपादन भारतातील आघाडीचे उद्योगपती राहुल बजाज यांनी ‘दिव्य मराठी'शी बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून संघ परिवार आणि भाजपतील काहींनी हिंदुत्वाबद्दलची वेगवेगळी वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. या संदर्भात बजाज यांनी मनोगत व्यक्त केले. "प्रवीण तोगाडियांना मी एकदा भेटलोय. अशोक सिंघल माझे मित्र आहेत; परंतु या मंडळींची हिंदुत्वाची भूमिका मला अतिरंजित वाटते. त्यांची टोकाची मते मला पटत नाही," असे स्पष्ट करतानाच अतिरेकी हिंदुत्ववादाचा मी समर्थक नसलो तरी मी भोंदू निर्धमवादीसुद्धा नाही, असे बजाज म्हणाले. बजाज म्हणाले, "कॉंग्रेस आणि समाजवाद्यांनी मुस्लिम, ख्रिश्चनांच्या मतांवर डोळा ठेवत नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. कॉंग्रेस-समाजवाद्यांच्या या धोरणाने देशाचे फार मोठे नुकसान केले. अल्पसंख्य मुस्लिम-ख्रिश्चनांसाठी या देशातल्या बहुसंख्य हिंदूंना त्रास कशासाठी द्यायचा, हे मला समजू शकलेले नाही. अनेक मुस्लिम माझे खूप चांगले मित्र आहेत.

‘मेक इन इंडिया' हवेच
गेल्या वीस वर्षात चिनी वस्तूंनी जगाची बाजारपेठ भरून टाकली आहे. आपल्या गणेशाची मूर्तीसुद्धा 'मेड इन चायना' असते. हे पाहून शरम वाटते. या पार्श्वभूमीवर मोदींची 'मेक इन इंडिया' घोषणा स्वागतार्ह आहे. देशी उद्योग जागतिक स्तरावरच्या दर्जाशी तोडीस तोड व्हायचा तर दोन्हीची स्पर्धा लागली पाहिजे. पण स्पर्धा लावण्याआधी देशी आणि बहुराष्ट्रीय उद्योगांना ‘कॉमन प्लॅटफॉर्म'वर आणावे लागेल. भारतीय उद्योगांची निर्यात वाढल्याने स्थानिक उत्पादनांचा दर्जा वाढेल, रोजगार निर्मिती होईल. आयातीसाठी आवश्यक परकीय गंगाजळी निर्यातीमधून मिळेल.

मोदी मात्र मर्यादेत
"संघ परिवार आणि भाजपमधील अनेकजण बेताल वक्तव्ये करीत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वागण्यात मला काही फरक दिसलेला नाही. पंतप्रधानपदी आल्यापासून त्यांनी कोणतीही चूक अद्याप केलेली नाही. त्यांनी अतिरेकी विधानेही केलेली नाहीत." - राहुल बजाज.

बाळासाहेब आणि शरद पवार
"शरद माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. तो माझा खूप जवळचा मित्र. बाळासाहेबांना ‘क्लोज फ्रेंड' म्हणता येणार नाही कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ‘मातोश्री'वर त्यांच्यासोबत कितीदा जेवलोय. बाळासाहेबांनी मला जितकं प्रेम दिलं त्याच्या दहा टक्के जरी मी उद्धवला देऊ शकलो तरी मला आनंद वाटेल."