आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IAS Dr. Shrikar Pardeshi Transfered At PMO Delhi Office

\'बुलडोझर मॅन\' श्रीकर परदेशी \'TEAM PMO\' मध्ये, उपसचिवपदी नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व 'बुलडोझर मॅन' अशी उपाधी मिळालेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. परदेशींची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जबाबदारी डॉ. परदेशी यांच्या खांद्यावर होती. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. श्रीकर परदेशी हे 2001 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. पीएमओमध्ये त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी असताना परदेशींनी शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा धडाका लावला होता. तसेच बांधकाम क्षेत्रात टीडीआर व एफएसआयमध्ये होणा-या भ्रष्टाचाराला आळा घातला होता. राजकीय दबावाला बळी न पडता बांधकामे पाडणे सुरुच ठेवल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडकरांनी परदेशींना 'बुलडोझर मॅन' ही उपाधी दिली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी असताना त्यांनी नागरिकांसाठी सुरु केलेली 'सारथी' या हेल्पलाईनने सा-या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी त्यांनी नांदेडमध्ये चमकदार कामगिरी केली होती. राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त असल्याचे पुढे आणत शेकडो बोगस शाळांची प्रकरणे त्यांनी पुढे आणली होती. परदेशी यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य सरकार 2011 पासून शिक्षकांचे समायोजन करीत आहे. तसेच राज्यात हजारो अतिरिक्त शिक्षक ठरल्याने 2011 पासून राज्यात (काही अपवाद वगळता) शिक्षक भरती करण्यात आलेली नाही.
दरम्यान, डॉ. परदेशी यांच्यासारख्या कार्यक्षम व प्रामाणिक अधिका-याला पीएमओसारख्या ठिकाणी काम करण्याची मोठी संधी मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांची दखल घेतली आहे. डॉ. परदेशी यांच्यासह आणखी तीन आयएएस अधिका-यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गुलजार नटराजन, ब्रिजेश पांडे, मयुर महेश्वरी यांचा समावेश आहे. गुलजार नटराजन यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाची संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. परदेशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नोंदणी न मुद्रांक महानिरीक्षकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र, तिथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला. सध्या ते राज्याचे नोंदणी न मुद्रांक महानिरीक्षक व पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणूनही डॉ. परदेशी कार्यरत होते.