पुणे- कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले अधिकारी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या कारणावरून ही धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापक अजय राजाराम चारखानकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजंगराव मोहिते-पाटील (रा. सुखसागरनगर, कात्रज) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही व्यक्ती खरी आहे की खोटी याचा शोध घेतला जात आहे.
मोहिते नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहलेल्या या धमकीच्या पत्रात म्हटले आहे की, पीएमपीमध्ये तुम्ही केलेली तिकीट भाडेवाढ समर्थनीय नाही. तुम्ही केलेल्या भाडेवाडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तुमचे आयुष्य उद्धस्त करु किंवा तुमच्या कुटुंबाचेही बरं-वाईट करु असे पत्रात म्हटले आहे. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही लाच घेतल्याचे पुरावे आमच्याकडे असून ते मुख्यमंत्र्यांना आणि न्यायालयाला सादर करु, त्यामुळे भाडेवाढ तातडीने मागे घ्या, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावा, असा धमकीवजा इशाराच दिला गेला आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, तुकाराम मुंढे यांना दिलेले धमकीचे पत्रातील मजकूर जसाच्या तसा...