आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमीच मैत्री जपली असती तर ‘महाभारत’ घडलेच नसते - शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा ‘एकसष्टी' सोहळ्यानिमित्त पुण्यात रविवारी शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. या वेळी (डावीकडून) तटकरे, ज्योती काकडे, डॉ. शां. ब. मुजुमदार, गिरीश बापट, हर्षवर्धन पाटील, बाळा नांदगावकर, दत्तात्रय धनकवडे.
पुणे - ‘राजकारणात यशस्वी व्हायचे तर वर्षातले ३६४ दिवस सर्वांशी चांगले संबंध आणि एक दिवस काय वाट्टेल ते झाले तरी चालेल, पण ही निवडणूक मला जिंकायचीच आहे, ही भूमिका ठेवावी लागते. नेहमीच मैत्री जपली गेली असती तर या देशात महाभारत घडले नसते....’ असे ‘विवेचन’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पुण्यात केले.

‘समोरचा बाजूला झाल्याशिवाय कधीच यशस्वी होता येत नाही,’ असा उपदेशही त्यांनी दिला.
आयुष्यात तब्बल चौदा निवडणुका लढवून एकही पराभव न पाहिलेला नेता ही पवारांची राजकीय ओळख आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचे गुपितच जणू पवार खुले करून सांगत होते. पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पवारांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते.

‘राजकारणात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे चूक नाही. यासाठी लोक जोडले पाहिजेत. माझे सगळ्या पक्षांत मित्र आहेत म्हणून माझ्याबद्दल आक्षेप घेतला जातो. मैत्री असली पाहिजे. ती फक्त आपल्या पक्षापुरती मर्यादित असू नये, असेही माझे मत आहे. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवावेत. सामाजिक हितासाठी योग्य ठिकाणी मदतही करावी.

पण निवडणुका येतात तेव्हा ती जिंकण्याचीच भूमिका घ्यावी लागते,’ असे पवार म्हणाले. यानंतर कुरुक्षेत्रावर द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करणा-या श्रीकृष्णाची कथाही पवारांनी ऐकवली. या कथेचा सारांश म्हणून त्यांनी वर्षातले ३६४ दिवस सर्वांशी मैत्री
आणि एक दिवस वाट्टेल ते करून निवडणूक जिंकण्याची भूमिका ठेवावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे, भाई वैद्य, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनाेद तावडे, आमदार नीलम गोऱ्हे आदींनीही काकडे यांना शुभेच्छा दिल्या.

सर्वपक्षीय स्नेह
सर्व राजकीय पक्षांमध्ये, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आदी स्तरांमध्ये संपर्क असलेला नेता अशी काकडेंची ओळख. याची झलक गौरव सोहळ्यात दिसून आली. भाजप नेते, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर दत्तात्रय धनकवडे हे सोहळ्याचे निमंत्रक होते. ‘सिम्बायोसिस'चे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर या वेळी उपस्थित होते.

सलाेखा जपण्याबाबत देशाचे नेतृत्व करावे
‘काेणत्याही निवडणुकीच्या प्रचाराला जाताना रायफल हातात असलीच पाहिजे, असा विश्वास ठेवणारी मंडळी देशाच्या अनेक भागांत दिसतात. मात्र, प्रत्येकच ठिकाणी राजकीय अभिनिवेश ठेवायचा नसतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय सौहार्दाचे वातावरण आवश्यक आहे. अंकुशच्या सत्काराच्या निमित्ताने पुण्याने हा आदर्श घालून दिला. राजकीय जीवनातही व्यक्तिगत सलोखा कसा जपावा या संदर्भात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे.’
–शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री