आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Pune University Did Not Rename ,show Strenght: Jokendra Kawade

पुणे विद्यापीठाचे नामांतर न केल्यास ताकद दाखवू : जोगेंद्र कवाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘येत्या सहा महिन्यांत पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘ज्ञानजोती सावित्रीबाई विद्यापीठ’ असे न केल्यास आगामी निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला ताकद दाखवावी लागेल,’ असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी दिला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणा-या दोन्ही कॉँग्रेस दुतोंडी असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्याच्या आगामी परिषदेत या दुतोंडी नेत्यांची नावे जाहीर करू, असे ते म्हणाले.

पुणे विद्यापीठाच्या नामांतरासाठी मार्चमध्ये पुण्यात ओबीसी व दलित संघटनांची राज्यस्तरीय परिषद घेतली जाणार आहे. ओबीसींच्या दीडशे संघटना यात सहभागी होणार आहेत. या परिषदेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारबाबतचा कौल जनतेकडून घेतला जाईल, असे प्रा. कवाडे म्हणाले. सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान देऊन गौरवण्यात यावे आणि पुण्याच्या प्रस्तावित विमानतळाला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव द्यावे, या व इतर दोन मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मागणी होणे हे दुर्दैवच

‘वांद्रे -वरळी सेतूला राजीव गांधींचे नाव आहे. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानाला संजय गांधींचे नाव आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापुरात शाहू स्मारकाची घोषणा झाली. कुर्ला टर्मिनसला लोकमान्य टिळकांचे नाव आहे. यातल्या कोणत्याही नामकरणाची मागणी नव्हती. त्यासाठी आंदोलने झाली नाहीत. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या कारकीर्दीत सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या नामकरणाची मात्र मागणी करावी लागते, हे दुर्दैव आहे.’ - प्रा. जोगेंद्र कवाडे

सत्ताधार्‍यांकडून प्रतिसाद नाही

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना या संदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांच्यापैकी कोणीच ठामपणे पाठिंबा दिला नाही. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या नावाची मागणी करावी लागते, हा कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा नादानपणा आहे. सोईचे नामकरण करणारे सरकार विशिष्ट लोकांना खुश करणारे राजकारण खेळत असल्याची टीका प्रा. कवाडे यांनी केली. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणार्‍या सरकारने स्वत:हून निर्णय घ्यायला हवा होता, असेही जोगेंद्र कवाडे म्हणाले.