आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याच्या सागरचे ‘आयआयटी’त अथांग यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)मध्ये 2012-13 च्या तुकडीत पहिला, नंतर या यशाबद्दल राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरव आणि पाठोपाठ फेसबुकचे साठ लाख रुपयांचे पॅकेज. ही यशोगाथा आहे पुण्यातील सागर संजय चोरडिया याची.

पवई (मुंबई) आयआयटीचे संचालक प्रा. देवांग खक्कर, अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सागरचा नुकताच सत्कार करण्यात आला. ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग वुईथ ऑनर्स अँड मायनर इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फर्मेशन’ या विषयात ‘बीटेक’ केलेल्या सागरची अमेरिकेतील फेसबुक कंपनीने निवड केली असली तरी एक वर्ष नोकरी केल्यानंतर स्टेनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तो एम.एस. करणार आहे.

शिक्षण पूर्ण करून भारतात परतणार
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परतणार असल्याचे सागर म्हणाला. ‘आयटी क्षेत्रात नवी कंपनी सुरू करण्यासाठी पुणे, बंगळूर या शहरांमध्ये चांगले वातावरण आहे. आयआयटीतून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी परदेशातून परत येऊन भारतात चांगले उद्योग सुरू केले आहेत. त्याच वाटेने मला जायचे आहे,’ असे तो म्हणाला. सागरचे वडील संजय चोरडिया आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चोरबेले यांनी सागरने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

मुंबई आयआयटी अव्वल : देशातल्या पंधरा ‘आयआयटी’मध्ये अव्वल राहण्याची कामगिरी मुंबईच्या आयआयटीने केली आहे. प्रा. खक्कर यांनी सांगितले, ‘‘सन 2013 मध्ये झालेल्या जेईई परीक्षेतील पहिल्या शंभरपैकी 67 विद्यार्थी मुंबई आयआयटीत आले. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय जेईईतल्या दहा टॉपर्सपैकी आठ जणांनी मुंबई आयआयटीचीच निवड केली.’’

कॅम्पसमध्ये नोकर्‍यांचा पाऊस
कॅम्पस इंटरव्हय़ूमध्ये सागरला मायक्रोसॉफ्ट, रॉकेट फ्युएल, टॉवर रिसर्च अशा प्रसिद्ध पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ऑफर मिळाली; परंतु सागरने नोकरीसाठी फेसबुकची निवड केली. फेसबुकमधले वर्क कल्चर आणि वातावरण अधिक चांगले वाटल्याचे त्याने सांगितले. आपल्या पुढील योजनांच्या दृष्टीने फेसबुकची नोकरी अधिक उपयोगी तसेच हा अनुभव गुणवत्ता वाढवण्यास उपयोगी ठरणार असल्याचे तो म्हणतो.