आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारामतीत शरद पवारांच्या हस्ते भाजप खासदाराचा नागरी सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील ‘जवळीक’ उघड करणारे अाणखी एक निमित्त गुरुवारी बारामतीकरांना अनुभवास अाले. भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांचा बारामतीकरांनी ठेवलेला नागरी सत्कार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तेच घडवून अाणला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट या वेळी उपस्थित हाेते.

बारामतीत अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या साबळे यांनी खासदारकी देऊन भाजपने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे बापट यांनी सुरुवातीलाच नमूद केले. साबळे हे दलित कुटुंबातून अाले असले तरी त्यांची वैचारिक बैठक संघाच्या विचारसरणीशी जोडलेली आहे. सध्या राजकारणात हेवेदावे, कुरघोडी, टोकाची भूमिका पाहायला मिळते. मात्र, अाज पवारांच्या हस्ते साबळेंचा सत्कार घडवून बारामतीकरांनी राजकारणातील सूडबुद्धीच्या विकृतीला संस्कृतीने उत्तर दिले अाहे, असे गाैरवाेद्गार बापट यांनी काढले.

सत्कारास उत्तर देताना खासदार साबळे यांनी ‘अापण राज्यसभेची प्रतिष्ठा राखून जनतेची सेवा करू,’ असे अाश्वासन दिले. त्यांच्या वक्तव्याचा धागा पकडत शरद पवार म्हणाले, ‘अापण गेल्या ४८ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच संसदीय कार्यप्रणालीचा उपमर्द घडेल असे कृत्य केले नाही. मात्र, अाज संसदेत सत्ताधारी सदस्यच अापली जागा साेडून पुढे येतात, गाेंधळ घालतात. लाेकसभा- राज्यसभेतील धिंगाणा पाहूनच ग्रामपंचायतीतही सदस्य गाेंधळ घालू लागले अाहेत. लाेक टीव्हीवर संसदेतील गाेंधळ पाहतात, मग ग्रामसभा तंट्याविना चालवा, असे अापण त्यांना काेणत्या ताेंडाने सांगणार,’ असा सवाल उपस्थित करतानाच राज्यसभेची प्रतिष्ठा राखण्याबाबत साबळेंनी केलेल्या निर्धाराचे काैतुक केले.