आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incident In Baramati : Teacher Take Poision With Dauther And Committed Suicide

बारामतीमध्ये मुलीसह शिक्षकाची विष घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (डीआरडीओ) मुलाला नोकरी लावतो, असे आमिष दाखवत संरक्षण खात्यातील काही अधिका-यांनी सुमारे 65 लाख रुपयांना गंडा घातल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका शिक्षकाने आपली पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात बापलेकीचा मृत्यू झाला, तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. शुक्रवारी बारामती औद्योगिक वसाहतीजवळील सूर्यनगरमध्ये हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला.


म्हसवडकर यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठीची तपासाकामी मदत होणार असून, त्यात नमूद केलेल्या अधिका-यांच्या चौकशीसाठी लष्करी पोलिसांची मदत घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.‘डीआरडीओ’मध्ये अभियांत्रिकी खात्यात भांडारपाल, लेखनिक, शिक्षक आदी पदांवर मुलांना नोकरी लावण्यासाठी संरक्षण खात्यातील काही अधिका-यांनी हनुमंत म्हसवडकर यांच्याकडून पैसे घेतले होते. म्हसवडकर यांनी आपल्याबरोबर इतरांचेही भले व्हावे या उद्देशाने ओळखीच्या शिंदवणकर, वावरे, मुदलियार यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठीही प्रयत्न केले होते. या सर्वांचे मिळून सुमारे 65 लाख रुपये संबंधित अधिका-यांना 20 महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु गेल्या काही दिवसांत नोकरीची ऑर्डर न मिळाल्याने हे सर्व कुटुंबीय चिंताग्रस्त होते. त्यामुळे इतरांनी म्हसवडकर यांच्याकडे, तर म्हसवडकर यांनी संबंधित अधिका-यांकडे पैसे परत मिळावेत म्हणून तगादा लावला होता. मात्र, ना पैसे परत मिळाले ना नोकरीची ऑर्डर.


नोकरीसाठी विकली जमीन
हनुमंत म्हसवडकर हे बोरीबेल (ता. दौंड) येथील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयात शिक्षक होते. याच गावात त्यांची थोडीफार जमीनही होती. अभियंता मुलाच्या नोकरीसाठी ही जमीन विकून गाठीला ठेवलेले सर्व पैसे त्यांनी संरक्षण खात्यातील अधिका-यांना दिले होते. मात्र, या अधिका-यांनी त्यांची फसवणूक केली.


मुलाला मावशीकडे पाठविले
आपल्यामुळे इतरांचेही पैसे बुडाले, ही सल म्हसवडकर यांच्या मनात होती. गेल्या काही दिवसांपासून ते तणावग्रस्त होते. याच मन:स्थितीतून त्यांनी कुटुंबीयांसह आत्महत्येचा मार्ग पत्करला. गुरुवारी रात्री मुलगा राहुलला बाहेरगावी पाठवून हनुमंत म्हसवडकर (52) यांनी आपली पत्नी लतादेवी (48) व मुलगी संध्याराणी (17) यांना विष देऊन कुटुंबीयांसह जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यात पिता व मुलीचा मृत्यू झाला, तर अत्यवस्थ असलेल्या लतादेवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंबीय माळशिरस तालुक्यातील कुरबावी (जि. सोलापूर) येथील मूळचे रहिवासी आहेत. संध्याराणीच्या गळ्यावर व्रण आढळून आले आहेत. त्यामुळे आधी मुलीचा खून करून नंतर आत्महत्या करण्यात आली असल्याचा संशय आहे.


दार उघडताच दिसले मृतदेह
हनुमंत म्हसवडकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यावर 18 जून 2013 अशी तारीख होती. गुरुवारी मुलगा राहुल मावशीच्या घरी गेल्यानंतर त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचे निश्चित केले. आपला भाचा सचिन हनुमंत कुंभार याला फोन करून सकाळी लवकर येण्याचा निरोपही दिला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता सचिनने म्हसवडकर यांच्या घराचा दरवाजा उघडला असता दोघे मृतावस्थेत व लतादेवी अत्यवस्थ स्थितीत आढळून आल्या.


अधिका-यांची नावे चिठ्ठीतून उघड
मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले की, ‘मुलाला नोकरी लावतो’ असे सांगून संरक्षण खात्यातील अधिकारी दशरथ आवंतकर यांनी आमच्याकडून 65 लाख रुपये घेतले. भारती बोडके, कुलकर्णी नावाचे अधिकारीही त्यात सामील होते. केवळ इतरांचे भले व्हावे या हेतूने मी या अधिका-यांना पैसे दिले. कोणाचीही फसवणूक केली नाही. मात्र, आता पैसे मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे. त्याला अधिकारीच जबाबदार आहेत.’ दरम्यान, मृत संध्याराणीने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या भावाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.