आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Meteorological Department (IMD) News In Marathi

यंदा पुन्हा दुष्काळाचे भाकीत; 93 टक्केच पाऊस, ‘आयएमडी’चा दुसरा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संपूर्ण देशात यंदा सरासरीच्या फक्त 93 टक्के पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी वर्तवले. गेल्याच महिन्यात ‘आयएमडी’ने पहिला अंदाज जाहीर करताना 95 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.

दरम्यान, जूनच्या 6 तारखेला केरळात दाखल झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) कर्नाटकच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. मान्सूनच्या वाटचालीस सध्या अनुकूल वातावरण असले तरी येत्या दोन दिवसांत तळकोकण आणि सह्याद्री डोंगररांगावर मान्सून बरसणार का, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. महाराष्ट्राच्या विविध भागांत मान्सून सक्रिय होण्यास आणखी काही कालावधी लागू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अंदाज चिंता वाढवणारा : ‘आयएमडी’चा दुसरा अंदाज देशाची चिंता वाढवणारा आहे. उत्तर भारतात सरासरीच्या 85 टक्के इतक्या सर्वात कमी पावसाचा अंदाज असून मध्य भारतातील पावसाची टक्केवारी 94 तर दक्षिण भारतात 93 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मोसमी वार्‍यांनी संपूर्ण केरळ आणि दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग व्यापून कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली. बंगालच्या उपसागरातही मध्यापर्यंत मान्सून पुढे सरकला. गुजरात ते केरळपर्यंतच्या सागरी किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र ढगांच्या वाटचालीस मदत करणारे आहे. दक्षिण भारतात मान्सूनचे सुखद आगमन झाले असून केरळ, तामिळनाडू येथे अनेक गावांमध्ये दमदार पाऊस सुरू झाला आहे. आसाम, आंध्रची किनारपट्टी आणि लक्षद्वीप बेटांवरही वादळी, मुसळधार पावसाने हजेरी लावली. इतर भागांतही येते काही दिवस असेच वातावरण कायम राहू शकते. पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एरव्ही दहा जूनपर्यंत मुंबापुरी गाठणारा मान्सून त्याआधी चार दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नजीकच्या सह्याद्री डोंगररांगांवर बरसू लागतो. यंदा पावसाचे हे वेळापत्रक चुकले असून त्याची प्रतीक्षा कायम आहे.

ऑगस्टमध्ये चांगला पाऊस
संपूर्ण देशात जुलै महिन्यात सरासरीच्या ९3 टक्के तर ऑगस्ट महिन्यात 96 टक्के पाऊस पडेल, असे ‘आयएमडी’ने जाहीर केलेल्या दुसºया अंदाजात म्हटले आहे. हा अंदाज खरा ठरला तर खरिपातील पिकांपेक्षा रब्बीच्या पिकांना तुलनेने अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात सुमारे 143 लाख हेक्टर इतके क्षेत्र खरिपाचे आहे. एकूण कृषी उत्पादनापैकी 69 टक्के पेरण्या खरिपातच होतात.

नागपुरात उष्माघाताचे चार बळी
विदर्भातील बुहतांश जिल्ह्यात तापमानाने सलग तीन दिवस 47 अंशाचा पारा ओलांडला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मात्र, सोमवारी 9 जूनला तापमान किंचित कमी झाले. असे असताना उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू झाला. यात नागपूर ग्रामीणमध्ये दोन आणि शहरातील दोघांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या ठिकाणीही पारा 45 अंशांच्या वर होता. येत्या 24 तासांतही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील.