आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची आज विजयादशमी; भारत-ऑस्ट्रेलियात पहिला वनडे पुण्यात रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सात सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या वनडेत दोन्ही संघ रविवारी समोरासमोर असतील. टी-20 सामन्यात जबरदस्त विजय मिळवणारी ‘धोनी ब्रिगेड’ पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून ‘विजयादशमी’ साजरी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे कांगारूंची टीम विजयी ट्रॅकवर परतण्यास प्रयत्नशील असेल.
आयसीसी वनडे क्रमवारीत सध्या टीम इंडिया पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. याचा अर्थ पुढच्या आठवड्यात जगातल्या दोन श्रेष्ठ टीम एकमेकांशी झुंजतील. आकडेवारीत बोलायचे झाल्यास सात सामन्यांच्या मालिकेत भारताला 6-1 ने पराभूत करून क्रमवारीच्या सिंहासनावर पोहोचण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे असेल. मात्र, धोनी ब्रिगेडविरुद्ध असा विजय मिळवणे कठीण आहे.
सामन्यावर लक्ष घातल्यास भारतीय संघाचे पारडे उजवे आहे. युवराजच्या पुनरागमनामुळे धोनीचा संघ मजबूत झाला आहे. या दोघांशिवाय शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना शानदार फॉर्मात आहेत. यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून मोठ्या स्कोअरची आशा आहे.
गोलंदाजी धोनीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. गत टी-20 सामन्यात ईशांत व आश्विन यांची चांगलीच धुलाई झाली होती. मात्र, विनयकुमार व भुवनेश्वर चांगल्या फॉर्मात आहे. जडेजानेसुद्धा चांगली कामगिरी केली आहे. युवराज आल्यामुळे गोलंदाजीसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व बेलीकडे
नियमित कर्णधार मायकेल क्लार्कच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व जॉर्ज बेलीकडे आहे. भारतीय वातावरणाशी एकरूप होण्यास त्याला थोडा वेळ लागेल. असे असले तरीही त्यांच्याकडे सामन्याचे चित्र बदलू शकणारे मॅचविनर खेळाडू आहेत. शेन वॉटसन, ब्रेड हॅडिन, मिशेल जॉन्सन, अ‍ॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फ्युकनर यांसारख्या खेळाडूंना आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याचा अनुभव असून, याचा कांगारूंना फायदा होऊ शकतो. क्लायंट मॅके आणि नॅथन कॉल्टर नील सुद्धा सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात. अर्थात ऑस्ट्रेलियाला मुळीच कमी लेखले जाऊ शकत नाही.

भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. आश्विन, भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा, विनय कुमार, अमित मिश्रा, मो. शमी, अंबाती रायडू,
जयदेव उनादकट.


ऑस्ट्रेलिया संघ
जॉर्ज बेली (कर्णधार), नॅथन कुल्टर नील, झेव्हियर डोहर्ती, जेम्स फ्युकनर, कॉलम फर्ग्युसन, अ‍ॅरोन फिंच, बे्रेड हॅडिन, मोईसेस हेनरिक्स, फिलिप ह्युजेस, मिशेल जॉन्सन, क्लायंट मॅके, शेन वॉटसन.


विजयाचा निर्धार
आमची टीम तुल्यबळ आहे. या सामन्यात आणि मालिकेत विजयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.
- महेंद्रसिंग धोनी, कर्णधार.