आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भारतीय भाषांमधील वाचक संख्येत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- युवा पिढीत वाचनाची आवड दिसत नाही, वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणार्‍यांच्या डोळ्यात राष्ट्रीय युवक सर्वेक्षणातील निष्कर्षांनी झणझणीत अंजन घातले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतीय भाषांमधील युवा वाचकांची संख्या वाढते आहे आणि भविष्यातही ती वाढत जाईल, अशी चिन्हे आहेत, अशी माहिती नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक एम. ए. सिकंदर यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
टेक्नोसॅव्ही पिढीमध्ये ई बुक्स झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. आंग्लाळलेल्या शहरी युवा पिढीला प्रादेशिक भाषांमधील साहित्याचे वाचन या नव्या माध्यमातून करावेसे वाटते आहे, हे जाणून प्रकाशन व्यवसायानेही त्यानुरूप पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
परदेशी भाषांमधील साहित्याचे हक्क मिळवण्याबाबत अलीकडे प्रकाशक जागरूक झाले आहेत, ही चांगली बाब असली तरी प्रकाशकांनी विदेशी भाषांप्रमाणेच अन्य भारतीय भाषांकडेही दुर्लक्ष करू नये. प्रादेशिक भारतीय भाषांचे अनुवादाचे हक्कही त्यांनी मिळवले पाहिजेत. मराठी प्रकाशकही आता बंगाली, कन्नड, मल्याळी अशा भाषांतील उत्तमोत्तम पुस्तके अनुवादित करण्याच्या प्रयत्नांत आहेत. अशा भाषिक आदानप्रदानातूनच साहित्य, वाचन संस्कृती आणि व्यावसायिक लाभ साधले जातील, असे सिकंदर म्हणाले.

ई-बुक्स ही तर संधी
ई-बुक्स हे पारंपरिक प्रकाशन व्यवसायावरील संकट नाही, तर ती एक उत्तम संधी आहे, हे जाणून प्रकाशकांनी पुढच्या वाटा ठरवल्या पाहिजेत. विदेशात राहणाºया मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगू भारतीय वाचकांपर्यंत पोहोचण्याची ती सोपी वाट ठरेल, असे सांगून सिकंदर म्हणाले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रादेशिक भाषांतील साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत केंद्र व राज्य सरकारची प्रकाशने असणाºया पुस्तकांची विक्री करण्यासाठी विविध राज्यांत दालने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुण्याची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. सध्या त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.

साहित्याच्या दर्जेदार अनुवादकांचा अभाव
प्रादेशिक भारतीय भाषांमधील साहित्याच्या सकस अनुवादासाठी उत्तम अनुवादक मिळत नाहीत, ही प्रकाशकांची सार्वत्रिक समस्या आहे. प्रकाशन व्यवसायाच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी कोलकाता विद्यापीठ आणि दिल्ली येथील डॉ. आंबेडकर विद्यापीठाशी एनबीटीने करार केला आहे. त्याच पद्धतीचा करार पुणे विद्यापीठाशी करण्याची योजना आहे, असेही सिकंदर यांनी सांगितले.