आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrilist And Worker's Interested Laws Make : Chief Minister

उद्योजक व कामगार या दोघांच्याही हिताची कायद्यात करणार : मुख्‍यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-‘येत्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेतील औद्योगिक उत्पादनाचा वाटा 18 वरून 26 ते 27 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट राज्याच्या उद्योग धोरणात ठेवले आहे. हा विकास साधताना उद्योजक व कामगार या दोघांच्याही हिताची जपणूक करणारे बदल कामगार कायद्यात केले जातील,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवस राखून ठेवण्याची घोषणही त्यांनी केली.

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने रांजणगाव (ता. शिरूर) येथे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की गेल्या वर्षभरात राज्यात 2 लाख 80 हजार कोटींची गुंतवणूक झाली. यातील मोठी गुंतवणूक ग्रामीण भागात झाली आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महाराष्‍ट्र आजही देशातील सर्वात आकर्षक राज्य आहे. हा लौकिक टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठीच समतोल विकासाचे धोरण राज्याने तयार केले आहे. यापुढील काळात सरकारी स्तरावरून निर्माण होणा-या नोक-यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने खासगी क्षेत्रातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी लागेल.

पुणे- नाशिकसह औरंगाबादला महत्त्व
चाकण, रांजणगाव आणि पुणे येथील प्रकल्प जागतिक वाहन उद्योगांच्या नकाशावर आहेत. येथील उत्पादनांचा वापर केल्याशिवाय वाहन उद्योजकांचे पान हलत नाही. याच धर्तीवर पुणे- नाशिक- औरंगाबाद या त्रिकोणाला महत्त्व येणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

स्थानिकांच्या रोजगाराची सक्ती करता येणार नाही
चाकण येथे ब्रिजस्टोनच्या कंपनीच्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले, ‘स्थानिकांना रोजगार मिळावा असा कायदा असला तरी पात्रता असलेल्या स्थानिकांनाच रोजगार मिळू शकेल. याबाबत राज्य शासन कोणावरही सक्ती करू शकत नाही.’

उद्योगांनाही सवलतीत वीज देऊ
5.65 पैसे प्रतियुनिट दराची वीज शेतक-यांना 1.10 पैशांत दिली जाते. शेतीपंपांसाठी 4 हजार कोटींचे अनुदान राज्य सरकार देते. हा फरक उद्योजकांकडून वसूल केला जातो. मात्र फार काळ हे करता येणार नाही. त्यामुळे उद्योगांनाही कमी दरात वीज पुरवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.
वळसेंनी मांडली मागण्यांची जंत्री
दिलीप वळसे पाटील यांच्या शिरुर-आंबेगाव मतदारसंघातच रांजणगाव येते. आज खुद्द मुख्यमंत्री मतदारसंघात आल्यामुळे वळसेंनी मागण्या त्यांच्यासमोर मांडून आमदाराची भूमिका निभावली. वळसे म्हणाले की, अध्यक्ष असल्याने मला विधिमंडळात जास्त बोलता येत नाही की गा-हाणी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाता येत नाही. चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतींमुळे पुणे- औरंगाबाद व पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. ती दूर करण्यासाठी शिरुर-मंचर-नारायणगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वळसेंनी केली.