आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Industry Formed Human Face : Dr N.R. Narayanmurti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगविश्वाला मानवी विकासाचा चेहरा मिळावा : डॉ. एन. आर. नारायणमूर्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उद्योग विकसित होण्यासाठी उद्योगविश्वाने सर्वप्रथम मानवी विकासाचा विचार करावा. शिक्षण, उद्योग आणि राजकारण या त्रिविध क्षेत्रांनी याबाबतची स्वत:ची जबाबदारी ओळखावी आणि सर्वसमावेशक विकासाची दिशा धरावी. चांगल्या संघटित देशासाठी तोच खरा लढा ठरेल, असे मत इन्फोसिसचे संस्थापक डॉ. एन. आर. नारायणमूर्ती यांनी येथे व्यक्त केले.

सातारा येथील अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ
डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते मूर्ती यांचा चिरमुले पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले, विश्वस्त पी. एन, जोशी व श्रीकांत जोशी याप्रसंगी उपस्थित होते.


मूर्ती म्हणाले, आयटी क्षेत्रात देश आघाडीवर आहे, विकासदर वाढत आहे, सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत देशाचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे, पण त्याच वेळी देशातील 40 कोटी लोकांचे रोजी उत्पन्न 15 रुपयांपेक्षाही कमी आहे, प्राथमिक आरोग्य सुविधा चिंताजनक अवस्थेत आहेत. तब्बल 50 टक्के शाळा एकशिक्षकी आहेत. मानवी विकास निर्देशांक तक्त्यात आपण तळाशी आहोत, हे चित्र दुसरीकडे आहे. त्यामुळे आर्थिक श्रीमंत बनण्याऐवजी बिइंग गुडसाठी काय योगदान देऊ शकतो, हा विचार आता महत्त्वाचा आहे.


डॉ. भटकर म्हणाले, 2020 पर्यंत चीन अमेरिकेच्या बरोबर उभा राहील, पण 2040 मध्ये भारत चीनलाही मागे टाकेल, असे नॅशनल इंटेलिजन्स ग्रुपच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे आगामी शतक भारताचेच असेल. टाईम, फॉर्च्यूनसारख्या मासिकांनी गौरवलेले आणि आयटी क्षेत्रात देशाला सर्वार्थाने प्रगतिपथावर नेणारे नारायणमूर्ती हे वैश्विक नेतृत्व आहे.


नारायण मूर्ती यांचा सत्कार हा केवळ व्यक्तीचा वा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा नाही तर तो भविष्याचा सत्कार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा विचार केला तर नारायण मूर्ती यांचे वर्णन सूर्य पाहिलेला माणूस असेच करावे लागेल.
इन्फोसिसतर्फे अक्षयपात्र योजना
* 13 लाख विद्यार्थ्यांना शाळेतच अन्न पुरवले जाते.
* अत्यल्प उत्पन्न गटांसाठी शाळेतच ग्रंथालय विकसित.
* रुग्णालयांची उभारणी.
* अमेरिकेत उद्योगक्षेत्र 9.1 टक्के उत्पन्न देते
* भारतात हे प्रमाण अवघे 3.1 टक्का हे प्रमाण वाढवण्याची गरज.


प्रागतिक विचारांचे पुणे - सुधा मूर्ती
प्रचंड गर्दी असलेल्या या कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनीही मनोगत मांडावे, असा आग्रह श्रोत्यांनी धरला. तो मान्य करत सुधा मूर्ती म्हणाल्या, पुण्याशी आम्हा दोघांचेही अनोखे नाते आहे. डेक्कन चित्रपटगृहात पाहिलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ आणि प्रभात चित्रपटगृहात पाहिलेल्या ‘अमरभूपाळी’ या चित्रपटांच्या आठवणी आजही जाग्या आहेत. मूर्ती यांना मराठी समजले नाही, तरीही आम्ही मराठी चित्रपटांचा आनंद लुटत असू. प्रागतिक विचारांमध्ये पुणे नेहमीच आघाडीवर असल्याने मला पुणे नेहमीच आवडते.