Home »Maharashtra »Pune» Third Edition Of Mahanakak In English Translation

‘महानायक’च्या इंग्रजी अनुवादाची तिसरी आवृत्ती; आतापर्यंत १४ भाषांत अनुवाद

जयश्री बोकील | May 09, 2017, 03:54 AM IST

पुणे-भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले सर्वाधिक तेजस्वी आणि रोमांचक पर्व असे ज्या कालखंडाचे वर्णन केले जाते ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्यकर्तृत्व उलगडणारी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील लिखित ‘महानायक’ ही कादंबरी इंग्रजी भाषेतही वाचकांना भुरळ घालत आहे. अल्पावधीत या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. ‘नेताजींविषयीचे हे लेखन वाचताना प्रत्यक्ष त्यांच्या सहवासाची जादू अनुभवता आली,’ या शब्दांत इंग्रजी अनुवादाचे कौतुक नेताजींच्या सहकारी कॅप्टन लक्ष्मी आणि नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी केले होते, अशी माहिती विश्वास पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

सुभाषबाबूंचे अलौकिक कार्य, त्यांनी केलेली आझाद हिंद फौजेची उभारणी आणि या फौजेने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला रोमांचक लढा.. हे सारे कादंबरीच्या विस्तृत पटावर अत्यंत प्रभावीपणे रंगवणारी विश्वास पाटील यांची ‘महानायक’ ही कादंबरी १९९८ मध्ये प्रकाशित झाली. आजवर मराठी भाषेत या कादंबरीच्या १८ आवृत्त्या निघाल्या आहेत. इंग्रजी अनुवाद बंगळुरू येथील कीर्ती रामचंद्रन यांनी केला आहे. ‘महानायक’ कादंबरी भारतीय ज्ञानपीठाने हिंदी भाषेत अनुवादित करून प्रकाशित केली. हिंदीतही या कादंबरीने उदंड लोकप्रियता मिळवली असून हिंदीत ११ आवृत्त्या निघाल्या आहेत. इंग्रजीत महानायकचा अनुवाद प्रकाशित होताच अल्पावधीत त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या आणि येत्या १४ मे रोजी इंग्रजी अनुवादाची तिसरी आवृत्ती येत आहे.

‘महानायक’चा अनुवाद ही आनंददायी प्रक्रिया
विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’ ही कादंबरी मी इंग्रजीत अनुवादित केली होती. त्यानंतर ‘महानायक’च्या अनुवादाचे काम हातात घेतले. तब्बल एक वर्ष मी अनुवादाचे काम करत होते. पाटील यांचे लेखन केवळ भारावून टाकणारे नसते, ते अनेक संदर्भ, पुरावे यांनी परिपूर्ण असल्याने मला अनुवाद करताना मूळ संदर्भांचेही वाचन आवश्यक वाटले. आता त्याची नवी आवृत्ती प्रकाशित होत असल्याचा आनंद वाटतो.
- कीर्ती रामचंद्रन, अनुवादक

अासामीतही अनुवाद
‘महानायक कादंबरीचा आसामी भाषेत अनुवाद झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी लगेच या कादंबरीच्या तीनशे प्रती विकत घेतल्या आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून ते ‘महानायक’चीच प्रत देत असत. इंग्रजी अनुवादामुळे महानायक अभारतीय वाचकांपर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे. नेताजींचे कार्यकर्तृत्व यामुळे अधिक व्यापक पटावर पोहोचेल.’
- विश्वास पाटील, कादंबरीचे लेखक

Next Article

Recommended