आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Gulzar In Pimpri Chinchwad Sahitya Sammelan

मायमराठी "गुलजार'! सिनेगीत लिहिणे म्हणजे दुसऱ्याच्या गाईला चारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवडमध्ये ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या प्रकट मुलाखतीने तर रंगतच आणली.

माझं लेखन, भावना, अनुभव वाचकांपर्यंत मी पोहोचवू शकतोय का, त्याला लेखन हे भिडतंय का, कवितेतून जे सांगू पाहतोय, ते संवादी आहे का, असे प्रश्न मला बेचैन करतात. या अर्थाने कोणतीही कविता दरक्षणी त्या कवीची परीक्षाच घेते... आपल्या हळव्या, तरल शब्दकळेनं जीवनाचा तळ शोधणाऱ्या गीत-कवितांचा नजराणा देणारे ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार साहित्य संमेलनातील मुलाखतीत कवितेविषयी मनोगत मांडत होते. चित्रपटगीत लिहिणे म्हणजे दुसऱ्याच्या गाईला चारा घालण्यासारखे आहे, अशी भावनाही त्यांनी मांडली.
मुख्य मंडप गर्दीने ओसंडला होता. या गर्दीला अजिबात निराश न करता गुलजार यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला ‘कवी’ खुबीनं उलगडला आणि हजारो रसिकांना कवीच्या रचना कवीकडून ऐकण्याचा योग लाभला.

मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळचे सत्र गुलजार यांच्या कवितांच्या सादरीकरणानं रंगतदार बनले आणि या कवितांमधील प्रगल्भ सामाजिक आशयानं रसिकांना अंतर्मुखही करून गेले. ज्येष्ठ पत्रकार, लेखक अंबरीष मिश्र यांनी गुलजार यांच्याशी संवाद साधला. गुलजार यांचे कवी मन अन्य भाषांमधल्या कवितेविषयीदेखील किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय त्यांच्या अनुवादित कवितांमधून आला.
कवी म्हणून जेव्हा एखादी कविता रसिकांपर्यंत पोहोचते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने ‘पोहोचते’ का, भिडते का, याचा शोध कवी घेत असतो. रसिक वाचक हे कवितेचे परीक्षक असतात. माझे लेखन त्यांच्या संवेदनशीलतेला पूरक ठरतेय का, संवादी आहे का, हा विचार मनात सतत असतो आणि तो कवीला अस्वस्थ करत असतो, याची कबुली गुलजार यांनी दिली.

लोकप्रियता हा निकष नाही
कुठल्याही कवितेची वा गीताची लोकप्रियता हा त्या रचनेच्या गुणवत्तेचा निकष ठरत नाही, हा मुद्दा स्पष्ट करताना गुलजार म्हणाले,‘पं. भीमसेन जोशी यांचे गायन आणि किशोरकुमार यांची गीते, दोन्ही उत्तमच आहेत; पण त्यांचा स्तर निरनिराळा आहे. त्यांची लोकप्रियतेच्या निकषांवर गुणात्मक तुलना होऊ शकत नाही. तसेच कवितेचे असते. कवितेचे गुणात्मक निकष गीताला लागू होत नाहीत.

वस्तुनिष्ठ विचारही लागतोच
कविता सुचताना, लिहिताना, कागदावर उतरताना तिच्याशी कवीचे नाते, नाळ जुळलेली असते; पण ती लिहून पूर्ण होताच कवीने वस्तुनिष्ठपणे कवितेकडे पाहिले पाहिजे. एक स्वतंत्र रचना म्हणून तिचा विचार केला पाहिजे, असे सांगून गुलजार म्हणाले,“काही कविता मनातल्या मनातच राहून जातात, शब्दरूप घेत नाहीत. त्याची कारणे अनेक असू शकतात. पण जोवर कवी व्यक्त होत नाही, तोवर ती अधुरी कविता त्याला बेचैन करत राहते. तो अस्वस्थ राहतो.''

मातृभाषा पंजाबी, पण लेखन उर्दूत
माझी मातृभाषा पंजाबी आहे, पण पंजाबी भाषेत मी फारसे लेखन केले नाही. मी व्यक्त झालो ते उर्दूतूनच, असे सांगून अनेक उत्तम शायर, कवी मंडळींची मातृभाषाही पंजाबी असली तरी त्यांनी उर्दूतून केलेले लेखन अधिक गाजले – फैज अहमद फैज, इक्बाल, साहिर लुधियानवी अशी अनेक उदाहरणे आहेत... असे ते मिश्किलपणे म्हणाले.

नज्म म्हणजे निखाऱ्यावरचे पातेले
एखादी नज्म निखाऱ्यावर ठेवलेल्या, वाफ कोंडलेल्या पातेल्यासारखी धुगधुगत राहते. वाफ जोवर मोकळी होत नाही, तोवर कविमन अस्वस्थ, बेचैन राहते. मात्र, एका मर्यादेनंतर सर्जनशीलता आपल्या वाटा शोधून काढते, मार्ग बनवत राहते.

चित्रपटगीत ही व्यावसायिक रचना
चित्रपटासाठी लिहिलेले गीत ही संपूर्णपणे व्यावसायिक रचना असते. कथानक, विशिष्ट प्रसंग, व्यक्तिरेखा, तेव्हाची भावस्थिती, भोवतालची इतर पात्रे वा परिसर यांचा विचार करून, दिलेल्या मीटरवर शब्द टाकायचे असतात. वहाँ अपनी मर्जी नहीं चलती, असे गुलजार म्हणाले.

अनुवादात मूड पकडणे महत्त्वाचे
गुलजार यांनी अनेक भाषांतील मान्यवर कवींच्या कवितांचे उत्तम अनुवाद केले आहेत. अनुवाद करताना मूळ कवितेचा मूड पकडणे सगळ्यात महत्त्वाचे असते. मूळ रचनेतील छंद, वृत्त, अलंकार अनुवादात कायम ठेवता येत नाहीत; पण त्या-त्या कवीची भावस्थिती ओळखून अनुवाद करता आला पाहिजे. तरीही मूळ कविता पूर्णांशाने अनुवादात पकडता येतच नाही. अत्तर एका कुपीतून दुसऱ्या कुपीत ओतले तरी पहिल्या कुपीत मूळ सुगंध उरतोच, तसेच हे असते, असे गुलजार म्हणाले. मराठी साहित्यातील संतसाहित्याविषयी मी ऐकले आहे, पण अनुवाद केला तो मात्र आधुनिक कवींच्या कवितांचा. त्यात कुसुमाग्रज, ग्रेस, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर यांच्या कविता प्रामुख्याने आहेत, असेही गुलजार म्हणाले.

अ पोएम अ डे
गुलजार यांनी अनुवादित केलेल्या विविध भाषांमधील कवींच्या रचनांचे संकलित पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. ‘ए पोएम अ डे’ असे या संग्रहाचे शीर्षक असेल. त्यामध्ये २७० कवींच्या ३२ भाषांमधल्या सुमारे ४०० कवितांचे अनुवाद समाविष्ट असतील.

कवितेसमोर आव्हाने
संगणकीय विश्वात कवितेसमोर यांत्रिक-तांत्रिक आव्हाने आहेत. कविता लिहिण्याऐवजी टाइप होते. पुस्तकांशी नाते संपत चालले आहे की काय, अशी चिंताही गुलजार यांनी व्यक्त केली.