पुणे - इराकमध्ये सुरू असलेल्या यादवीत पुण्यातील डी एक्सेस आयटी इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचे सहा कर्मचारी व एक व्यवस्थापक अडकून पडले आहेत. करबला शहरात अद्ययावत रुग्णालयाची उभारणी सुरू असून यातील काही कामाचे कंत्राट पुण्यातील ‘डी एक्सेस आयटी इन्फ्रा’ कंपनीला मिळालेले आहे.
या कामासाठी हे सातही जण 2013 पासून करबला शहरात आहेत. यापैकी सहा कर्मचारी मुंबईचे तर कंपनी व्यवस्थापक पुण्याचे रहिवासी आहेत. हे सर्व लोक सुरक्षित असून नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचा दावा कंपनीचे संचालक नीलेश ठाकरे यांनी केला आहे. या सातही जणांनी भारतात परत येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र त्यांना व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत.