पुणे - चालू शैक्षणिक वर्षात अकरावीसाठी राबवण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती ‘सिकॉम’ (सिस्टिम्स करेक्टिंग मूव्हमेंट) या संस्थेने शासनाला दिलेल्या अहवालात दिली आहे. त्याची तातडीने दखल घेत शिक्षण संचालक अश्विनी भिडे यांनी शिक्षण आयुक्त तसेच उपसंचालकांकडे अभिप्राय मागितले असून, त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.
यंदा अकरावीसाठी प्रथमच ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, ऑनलाइनच्या जोडीने पुन्हा टेबल पद्धत, ऑफलाइन तसेच महाविद्यालयीन स्तरावरही प्रवेश दिले गेल्याने ऑनलाइन प्रक्रिया निरर्थक ठरल्याचे ‘सिकॉम’ने नमूद केले आहे. काही महाविद्यालयांनी गुणवत्ता नसतानाही प्रवेश दिले. महाविद्यालयात जागा रिक्त असूनही प्रवेश पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. कटऑफची शास्त्रीय व्याख्या नसल्याने ६०० ऑफलाइन प्रवेश दिले आहेत, असे आरोप ‘सिकॉम’चे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी केले.
पंतप्रधानांकडे अहवाल : माहिती अधिकारात दिलेले पत्र आणि त्यावर झालेली कार्यवाही यांची माहिती अहवालात देण्यात आली आहे. पूर्वीच्या प्रवेश प्रक्रियेतील चुका, त्रुटी, उणिवा पुराव्यानिशी सादर केल्यात. या अहवालाची प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अहवालाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.