पुणे- पाच
इस्रायली विद्यापीठांचे शिष्टमंडळ आजपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहे. 1992 मध्ये भारत-इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून पहिल्यांदाच इस्रायली विद्यापीठांचे शिष्टमंडळ भारतात येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. मुंबईतील इस्राइल कौन्सुलेटचे जनसंपर्क अधिकारी अनय जोगळेकर यांनी ही माहिती दिली.
इस्रायली विद्यापीठांचे शिष्टमंडळ मुंबई, दिल्ली आणि पुण्यातील काही महाविद्यालयांना भेट देणार आहे. टाटा समाज विज्ञान संस्था, आयआयटी मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आदी संस्थांचा यात समावेश असेल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्ष मंजू सिंह यांचीही भेट घेतली जाणार आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात हे शिष्टमंडळ विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहे. जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ, तेल-अवीव विद्यापीठ आणि टेक्निऑन-इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही विद्यापीठ जगातील 100 सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये गणली जातात. बेन गुरियॉन विद्यापीठ आणि हर्झिलियाचे इंटर डिसिप्लिनरी सेंटर यांचा सर्वोत्तम 300 विद्यापीठांमध्ये समावेश होतो.
इस्रायली शिक्षण व्यवस्था- राज्यातील 2-3 जिल्ह्यांएवढे आकारमान असणाऱ्या इस्रायलमध्ये नऊ विद्यापीठे आहेत. इस्रायलमध्ये उच्च शिक्षण प्रामुख्याने हिब्रू या स्थानिक भाषेत होत असले तरी आता सर्वच विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विभाग सुरू केले आहेत. प्रत्येक विद्यापीठाची
आपल्याकडील तंत्रज्ञानाचे पेटंट घेऊन त्याचे विपणन करणारी कंपनी आहे.
भारत दौरा कशासाठी?- इस्रायलमधल्या उच्च शिक्षणाचा खर्च अमेरिका, युरोप तसेच ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी असतो. इस्रायल सरकारतर्फे दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. भारतातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इस्रायलमध्ये आकृष्ट करणे एवढे मर्यादित उद्दिष्ट ठेवता भारतातील विद्यापीठे आणि कॉलेजांशी सहकार्य करण्याचा शिष्टमंडळाचा मानस आहे.