आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल देशामध्येही होतोय मराठी भाषेचा जागर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठीचा जागर भौगोलिक सीमा पार करून विदेशात होत आहे. मराठीची गोडी इस्रायलसारख्या विदेशी भूमीतील भाषाप्रेमींनाही लागली आहे. इस्रायलमधील २२ भाषाप्रेमींनी मराठी भाषेचे प्राथमिक संवाद कौशल्य आत्मसात केले असून अजून वरच्या पातळीची मराठी शिकण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.   
 
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई विद्यापीठ आणि इस्रायलचे तेल अवीव विद्यापीठ या तीन संस्थांनी एकत्रित येऊन इस्रायलमध्ये मराठी भाषेचे प्रारंभिक वर्ग घेण्यासंबंधी नुकताच करार करण्यात आला. या करारानुसार प्रा. विजय तापस, प्रा. सोनाली गुजर आणि कादंबरी भंडारे या अध्यापकांनी इस्रायलमध्ये एक महिना वास्तव्य करून तेल अवीव विद्यापीठात मराठी भाषेचे प्रारंभिक अध्यापन केले. इस्रायलमध्ये यानिमित्ताने प्रथमच मराठी भाषा शिकवली गेली. पहिल्या वर्गाला २२ विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.  
 
‘मराठी भाषेच्या संवादात्मक अध्यापनावर भर देण्यात आला. दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी किमान ५० वाक्ये इस्रायली विद्यार्थ्यांना उच्चारता यावीत, त्यांचे अर्थ समजावेत, असे अध्यापनाचे स्वरूप होते. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने अमराठी भाषकांना मराठी आधुनिक पद्धतीने शिकवणारा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच अमराठी भाषकांच्या गरजांचा तपशीलवार विचार करून काही पाठ्यपुस्तक तयार केली आहेत. त्यांच्या या पद्धतीचा आधार घेऊनच इस्रायली विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम पार पडला. आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या अभ्यासक्रमानंतर त्यांनी अधिक सविस्तर, वरच्या पातळीवरील मराठी शिकण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत.

तरुण, ज्येष्ठ नागरिकही विद्यार्थी  
{ इस्रायलमध्ये प्रथमच मराठी भाषेचे अध्यापन सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. येथील विद्यार्थ्यांचा वयोगट २८ ते ५५ असा होता. त्यामध्ये लेखक, चित्रकार, व्यावसायिक, गायक अशा क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. हा वर्ग अधिक व्यापक होईल का, अशीही विचारणा झाली.   
{ तेल अवीव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. रानान रेन, इस्रायल दूतावासाचे डेव्हिड अकाव्ह, भारतीय दूतावास सचिव देवाशिष विश्वास तसेच राज्य मराठी विकास संस्था, मुंबई विद्यापीठ आणि तेल अवीव विद्यापीठ यांनी या उपक्रमासाठी निधी उपलब्ध केला होता.  

मराठीची परीक्षाही..   
इस्रायलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या वर्गाला प्रवेश घेतला होता, त्या सर्वांची परीक्षा वर्गाच्या शेवटी घेण्यात आली. तोंडी ६० गुण आणि लेखी ४० गुण अशी विभागणी केली होती. भाषिक खेळ, चित्रांचा, चिन्हांचा वापर आणि हावभाव हे माध्यम अधिक वापरण्यात आले. स्वर, व्यंजन, काळ, लिंग, वचन यांचा प्राथमिक परिचय, दैनंदिन उपयोगाची छोटी वाक्ये, प्रवासात उपयुक्त ठरेल अशी माहिती, यांचा अभ्यासक्रमात समावेश होता, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या प्रकल्प सहायक कादंबरी भंडारे यांनी दिली.    
बातम्या आणखी आहेत...