आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: लव मॅरेज केल्याने कुटुंबावर बहिष्कार, गौड ब्राह्मण समाजाच्या 5 पंचांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुलाने आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायतीच्या पंचांनी एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या कुटुंबाला पुन्हा समाजात परतण्यासाठी एक लाख रुपयांचा दंडही भरण्यास पंचांनी सांगितले आहे. या प्रकरणी तेजाराम डांगी, मोतीराम डांगी, विजय डांगी, बालकिसन डांगी, दीपचंद डांगी या पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौड ब्राह्मण समाजाचे शंकर डांगी (54, मूळ राहणार राजस्थान) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. शंकर डांगी यांच्या चुलत्याचे आठ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्यावर धनकवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यासाठी डांगी गेले होते. या वेळी जातपंचायत पंचांनी त्यांना अडवले. तुझ्या मुलाने आंतरजातीय विवाह केल्याचे सांगत त्यांना वाळीत टाकण्यात आल्याचे सांगितले. तसेच समाजात पुन्हा परतण्यासाठी एक लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.
शंकर डांगी यांनी सांगितले, माझा मुलगा उच्चशिक्षित असून त्याने शिकलेल्या आंतरजातीय मुलीशी विवाह केला. यामुळे आम्हाला वाळीत टाकून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुलाने आंतरजातीय लग्न का करायचे नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. पंचांनी आम्हाला समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही डांगी यांनी केली आहे.

जातपंचायतविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी- पाटील
जातपंचायतविरोधी कायदा संपूर्ण देशासाठी पथदर्शक असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभर जनजागृती करणार असल्याची माहिती अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील जात पंचायत मूठमाती अभियानचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी दिली. पाटील म्हणाले, 13 जात पंचायती अंनिसच्या मदतीने बरखास्त झाल्या. मात्र, हजारो जात पंचायतींचे काम अजूनही सुरू आहे. नव्या कायद्यानुसार, न्यायनिवडा करणारी फतवे काढणारी गावकी किंवा व्यक्तींचा समूह जात पंचायत समजली जाईल. जात पंचायत बसवून दंड करणे, वाळीत टाकणे, मानवी हक्कांचे उल्लंघन हा दखलपात्र जामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. पीडितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी अंनिस प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...