"एक-दुसऱ्याला जाणून घेण्यासाठी भाषा तयार झाली. परंतु हीच भाषा संवादातला मुख्य अडथळा बनली आहे. भाषांच्या भिंतींमुळे अनमोल खजिन्यापासून आपण वंचित राहतो. भारतीय भाषांमधले आदानप्रदान वाढण्यासाठी या भिंतींना अनुवादाच्या खिडक्या पाडाव्यात,’ असे मत प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
‘अनुवाद कितीही चांगला केला तरी तो लेखकाच्या अस्सल भावना पोचवू शकत नाही. एका कुपीतले अत्तर दुसऱ्या कुपीत घेताना थोडासा गंध तरी विरून जाणारच ना. पण अनुवादाच्या खिडक्या नसत्या तर आपल्याला रशियन, लॅटिन आदी भाषांमधले साहित्य समजलेच नसते. प्रत्येक भाषा शिकणे शक्य नसते. मराठीला महान लेखकांची परंपरा आहे. या लेखकांचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये जायला हवे तसेच इतर भारतीय भाषांमधले साहित्यसुद्धा मराठीत यावे,’ अशी अपेक्षा अख्तर यांनी व्यक्त केली.
‘माझा जन्म मध्य प्रदेशातला. मी वाढलो उत्तर प्रदेशात. त्या वेळी हिंदी- उर्दूत खुश होतो. १९ वर्षांचा असताना मुंबईत आलो तेव्हा मला पहिल्यांदा समजले की विजय तेंडुलकर कोण, ते काय लिहितात? पु. ल. देशपांडे काय लिहितात? हे जेव्हा जाणले तेव्हा मला लाज वाटली. दुसऱ्या भाषेच्या साहित्यातून त्या समाजाची, वर्गाची ओळख होते. माणसांना वाचायला मिळाले की स्नेह उत्पन्न होतो. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून का होईना पण अनुवादाची खिडकी हवीच. मध्यमवर्गाकडे लिहिण्याइतकी फुरसत असते आणि संवेदनाही असते. परंतु त्यांनी ही जबाबदारी सोडली आहे. मी अशीही कुटुंबे पाहिली आहेत, ज्या घरांमधल्या कोच आणि पडद्यांना मॅचिंग होणारी पुस्तके इंटिरिअर डेकोरेटरच आणून देतो,' असे अख्तर म्हणाले.
‘साहित्याच्या महतीबद्दल बोलायचे तर मला पु. ल. देशपांडे यांचीच आठवण होते. ‘पु.लं'नी सांगून ठेवले आहे. तुम्हाला जिवंत ठेवणाऱ्या पोटाची भूक भागवू शकेल असे कोणते तरी काम तुम्ही शिकले पाहिजे... आणि कशासाठी जगायचे हे जाणण्यासाठी एखादी कला आत्मसात केली पाहिजे,’ असे अख्तर म्हणाले.
सामान पीछे रह गया
‘मध्यमवर्गाचे जीवनमान उंचावले. ‘लेकीन कहॉं से कहॉं पहुंचने की दौड में' काही मूल्ये सुटली. त्या म्हणजे साहित्य, कला, संस्कार, परंपरा. वेगवान गाडी पकडताना काही सामान फलाटावरच राहावे तसे हे झाले. या अपराधाला माझी पिढी जबाबदार आहे,'' असे अख्तर म्हणाले. नव्या पिढीला पुन्हा साहित्य, कला, संगिताची गोडी लागत आहे. आमच्या पिढीमुळे जो सांधा सुटला होता तो जोडला जात आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.