आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जाणता’स्वर निमाला! ‘सुध मुद्रा, सुध बानी’चे दृश्यरूप...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नानांनी मैफलीतील आणि संगीत नाटकांतील गायन.. यांच्यातील फरक नेमकेपणाने स्वतःमध्ये मुरवला. मैफलीत तासभर एकच राग सविस्तर मांडणारे नाना संगीत नाटक करताना आपल्या भूमिकेचे भान सांभाळून नेमके आणि मोजके गात असत. मैफल गायक म्हणून असणारे स्वतःचे स्थान त्यांनी नाटकात कधीच आणले नाही याची आवर्जून नोंद घ्यायला हवी. 


ज्ये ष्ठ गायक, संगीत रंगभूमीवरील अभिनयकुशल नट आणि गानगुरू पंडित नारायणराव बोडस यांच्या निधनाने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या परंपरेतील ‘जाणता’ आणि ‘अस्सल’ स्वर हरपला आहे. ‘सुध मुद्रा सुध बानी’ या उक्तीचे मूर्तिमंत दृष्यरूप असणारे पं. नारायणराव बोडस अभिजात गायकीची मैफल जितक्या सहजतेने रंगवत तितक्याच सहजतेने संगीत रंगभूमीवर विविध व्यक्तिरेखाही साकारताना बुजुर्ग रसिकांनी अनुभवल्या आहेत. 


ब्रिटिश राजवटीच्या ऐन भरातल्या कालखंडात पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी तत्कालीन अखंड हिंदुस्तानात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार- प्रसार - अध्यापनाची जी परंपरा निर्माण केली त्या परंपरेचे पं. नारायणराव बोडस हे दुसऱ्या पिढीतील पाईक होते. कलावर्तुळात नारायणराव बोडस हे ‘नाना’ या नावाने सुपरिचित होते. त्यांचे वडील पं. लक्ष्मणराव बोडस हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे अंतरंग शिष्य. पलुस्करांनी आपली ग्वाल्हेर घराण्याची गायकी आपल्या निवडक अंतरंग शिष्यांकडे सुपूर्द करून त्यांना देशाच्या विविध भागांत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार - प्रचार करण्याचा जो आदेश दिला तो आजीवन आचरणात आणणाऱ्या लक्ष्मणराव बोडस यांनी कराची येथे गुरुअाज्ञेने संगीत विद्यालय सुरू केले. नानांचा जन्म कराचीचा होता. गाणे ते रक्तातूनच घेऊन आले होते. वडिलांकडून त्यांना ग्वाल्हेर घराण्याची अस्सल तालीम लाभली. पुढे नानांनी पं. प्रल्हादपंत गानू यांच्याकडून आग्रा घराण्याची गायकीही आत्मसात केली आणि मैफलीतून, नाट्यपदांतून आपल्या वेगळ्या गायकीचा ठसा उमटवला. 


भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसाराचे व अध्यापनाचे तीर्थरूपांचे व्रत नानांनीदेखील पुढे चालवले. गांधर्व महाविद्यालय - वाशी येथे ते अनेक वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. अत्यंत निःस्वार्थपणे केवळ सेवा म्हणून नानांनी संगीताच्या अध्यापनाचे कार्य केले. संगीताचा आपला वारसा त्यांनी त्यांचे पुत्र आणि शिष्य केदार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अनेक शिष्य तयार केले आहेत. शास्त्रीय संगीताच्या मैफली गाजवत असतानाच मराठी संगीत रंगभूमीवरही नानांनी स्वतःचे एक युग निर्माण केले होते, असे बुजुर्ग रसिक आवर्जून सांगतात. नानांकडे अभिजात संगीत जसे होते तशीच देखण्या रूपाची देणगीही परमेश्वराने त्यांना बहाल केली होती. उत्तम गाणे, देखणे रूप यांच्या जोडीला नानांनी उत्तम अभिनय संपादन करून संगीत रंगभूमी गाजवली. जुन्या काळातील गंगाधरपंत लोंढे यांचा अपवाद वगळता संगीत रंगभूमीवर नानांइतका देखणा नट झाला नाही अशी ग्वाही कित्येकांनी दिली आहे. संगीत रंगभूमीवरील नानांचे गायन पं. राम मराठे यांच्या गायकीशी नाते सांगणारे होते. गमतीचा भाग असा की, नानांच्या संगीत रंगभूमीवरील कामाची सुरुवात ‘मेघदूत्तोत्तरम्’ या श्री. भिवंडी वेलडकरांच्या संस्कृत नाटकातून झाली. त्यानंतर अनेक संस्कृत संगीत नाटकांतून त्यांनी काम केले. मग सौभद्र, मानापमान, स्वयंवर, शारदा.. अशा जुन्या संगीत नाटकांतील प्रमुख भूमिका त्यांनी गाजवल्या. योग्य वेळी ते स्वतःहून नायकाच्या भूमिकांतून बाहेर पडले आणि पुन्हा मैफलीत रमले. मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिनिधित्व करताना आम (प्रचलित) रागांप्रमाणे अनवट (अप्रचलित) रागही ते आवर्जून सादर करत असत. मालव, गुंजी काना, चंपक, मालगुंजी.. ही अशा अनवट रागांची काही उदाहरणे सांगता येतील. नानांचे गाणे ग्वाल्हेरच्या पारंपरिक पठडीचे आणि शिस्तीचे असले तरी ते ‘साचलेले’ नव्हते. कला आणि कलाविष्कार यांच्याकडे पाहण्याची त्यांची वृत्ती ‘स्वागतशील’ असल्याने नानांचे कलाविषयक आकलन आणि सादरीकरण ‘प्रवाही’ होते. कलेच्या संदर्भात झालेल्या वेगळ्या प्रयोगांतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. रुळलेल्या वाटांवर चालताना अनवट वाटाही चालून पाहण्याइतपत त्यांच्या वृत्ती स्वागतशील होत्या, कवाडे खुली होती. 


ज्येष्ठ संगीत समीक्षक, गायक आणि लेखक डॉ. अशोक दा. रानडे यांचे आणि नानांचे आते-मामे भावंडांचे नाते होते. डॉ. रानडे यांनी सादर केलेल्या सांगीतिक उपक्रमांमध्ये नानांचा आवर्जून सहभाग असे. ‘बैठकीची लावणी’ हा डॉ. रानडे यांनी ‘एनसीपीए’साठी सादर केलेला प्रयोग नानांनी गाजवला होता. जागतिक मराठी परिषद अधिवेशनात डॉ. रानडे यांनी सादर केलेल्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात नानांनी पारंपरिक लोकप्रिय नाट्यपदांसह वझेबुवांच्या वेगळ्या वळणाच्या चालीही रसिकांसमोर सादर करून दाद मिळवली होती. कलेतील नावीन्य आणि सादरीकरणातील वेगळेपण त्यांनी कायम जपले. ‘टप्पा’ हा अनवट संगीतप्रकार ते उत्कृष्ट गात असत.. त्यातही ‘पश्तू’सारख्या (सात मात्रा) अनवट तालात ते लीलया फिरत असत. नानांनी कलाकार म्हणून मैफलीतील गायन आणि संगीत नाटकांतील गायन.. यांच्यातील फरक नेमकेपणाने स्वतःमध्ये मुरवला होता. मैफलीत तासभर एकच राग सविस्तर मांडणारे नाना संगीत नाटक करताना आपल्या भूमिकेचे भान सांभाळून नेमके आणि मोजके गात असत. मैफल गायक म्हणून असणारे स्वतःचे स्थान त्यांनी नाटकात कधीच आणले नाही याची आवर्जून नोंद घ्यायला हवी. एक कलाकार, अभिनेता म्हणून समांतर कारकीर्द सुरू असताना त्यांनी गानगुरू म्हणूनही आपली जबाबदारी यशस्वीपणे निभावली. मुक्तहस्ताने त्यांनी शिष्यांना स्वतःजवळचे गानधन प्रदान केले. प्रतिभेचे देणे लाभले असल्याने अनेक बंदिशी रचल्या. नव्या पिढीच्या हाती योग्य वेळी सूत्रे सोपवण्याची परिपक्वता दाखवली. नव्या काळातील नवी तंत्राधारित साधने स्वीकारली. परंपरेचे यथायोग्य पालन करून विवेकी वृत्तीने नव्या विचारांशी, पिढीशी, साधनांशी, गतीशी जुळवून घेतले. जुन्या-नव्याचा सांधा जोडून घेत राहिल्याने नाना कायम साऱ्यांना हवेहवेसे वाटले. त्यांचे जाणे अकाली नसले तरी यासाठीच दुःखदायक आहे. नानांनी हयातभर आपल्या तपस्येने साध्य केलेल्या या दुर्मिळ गुणसंपदेचे पाथेय जपणे आणि आचरणे हीच खरी आदरांजली ठरेल.

 

- जयश्री बाेकील, वरिष्ठ प्रतिनिधी,पुणे

बातम्या आणखी आहेत...