आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाँटी, लिएंडर अन् रोनाल्डोलासुद्धा येते ‘फिट्स’ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - क्रिकेटच्या मैदानावर चित्त्यासारखी झेप घेत चेंडू अडवणारा जाँटी -होड्स, फुटबॉलवर जादुई हुकूमत असलेला रोनाल्डो आणि भारतासाठी अनेक पदके जिंकणारा टेनिसवीर लिएंडर पेस.... हे जगविख्यात खेळाडू ‘फिट्स’ किंवा फेपरे येण्याच्या आजाराने त्रस्त आहेत. वैद्यकीय भाषेत ‘एपिलेप्सी’ नावाने ओळखल्या जाणा-या या आजाराबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम पुण्याच्या संवेदना फाउंडेशन आणि इंडियन एपिलेप्सी असोसिएशनतर्फे केले जात आहे.

योग्य उपचारांमुळे या आजारावर मात करता येते. परंतु गैरसमज किंवा अंधश्रद्धेतून इलाज होत नाहीत आणि यातूनच सामाजिक समस्या निर्माण होतात. महाराष्ट्रात दर दोनशे लोकांमागे दोन-तीन व्यक्तींना हा आजार आहे, अशी माहिती इंडियन एपिलेप्सी असोसिएशनच्या डॉ. नंदन यार्दी यांनी दिली.संवेदना फाउंडेशनच्या यशोदा वाकणकर यांनी सांगितले, की फेपरे येणा-या ंचे विवाह जमण्यात अडचणी येतात. त्यामुळेच अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम आमची संस्था करते. अशा रुग्णांसाठी आम्ही वधू-वर मेळावे घेतो. येत्या 17 फेब्रुवारीला पुण्यात एपिलेप्सी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.

फेपरे कशामुळे येते?
उत्तेजित करणारे, योग्य दबाव ठेवणारे विद्युतप्रवाह मेंदूत निर्माण होत असतात. या दोन प्रवाहांचा समतोल राहिल्यास काम सुरळीत चालते. मात्र न्यूरोट्रान्समिटरमध्ये असंतुलन निर्माण झाले की फेपरे येते. गर्भावस्थेत असताना मेंदूची योग्य वाढ न होणे, अर्भकाला ऑक्सिजन कमी पडणे, मेंदूला इजा होणे, मेंदूला संसर्गजन्य रोग होणे, मेंदूत जंतूंची अंडी जाणे, शरीराचा रासायनिक समतोल बिघडणे आदी कारणांमुळे हा आजार होतो.

असे करा उपाय...
भूतबाधा, जादूटोणा किंवा देवीचा प्रकोप यामुळे फेपरे येत असल्याच्या अंधश्रद्धा आहेत. फेपरे येणा-या माणसाकडे तो व्यसनी असल्याच्या संशयातूनही पाहिले जाते. परंतु मुळात हा मेंदूचा आजार असल्याचे समजून घेतले जात नाही. यावर उपचार उपलब्ध आहेत. नियमित उपचारांमुळे 80 ते 90 टक्के फेपरे थांबवता येतात. कोणत्याही वयात हे उपचार सुरू करता येतात. फेपरे आल्यानंतर पुढच्या दोन-तीन मिनिटात ते नैसर्गिकरीत्या थांबते. अशा वेळी रुग्णाभोवतीची गर्दी टाळून त्याला एका बाजूवर झोपवावे. तोंडात रुमालाची घडी द्यावी म्हणजे इतर धोके टळतात.’’
डॉ. नंदन यार्दी, आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी तज्ज्ञ.