आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकरांच्या कन्या व नगरसेविका ज्योती चिताळकर यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलुज-  उपसभापती उत्तम जाणकर यांची मुलगी ज्योती चिताळकर यांनी बोगस जातीच्या दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवल्याचे उघड झाले आहे. जात पडताळणी समितीने त्यांचा  जातीचा दाखला रद्द ठरवला असून, हा दाखला कुठल्याही शासकीय कार्यालयातून देण्यात आलेला नव्हता अशी धक्कादायक माहिती दिली आहे. 
 
या प्रकरणी जातीचा बोगस दाखला देणे आणि सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील देवस्थानची जमीन हडपल्याप्रकरणी विवादात सापडलेले भाजप नेते उत्तम जाणकर यांचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने-देशमुख यांनी सोलापूर येथील विभागीय जात पडताळणी समितीचा आदेश पत्रकारांना दाखवला. के.एस.आढे, ए.एम.शेंदारकर व के. एच. बगाटे यांच्या समितीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे  की, हिंदू-खाटीक या जातीच्या दाखल्याच्या आधारे ज्योती उत्तम जाणकर उर्फ ज्योती राहुल चिताळकर यांनी आळंदी येथील नगरपरिषदेची निवडणूक लढवली आहे. अनुसूचीत महिला या प्रवर्गाच्या जागेवर त्या निवडूनही आल्या आहेत. परंतु, निवडणुकीवेळी त्यांनी दाखल केलेला जातीचा दाखला पडताळणी करताना दाखला बोगस असल्याचे आढळले आहे. 

ज्योती जाणकर यांचा दाखला पंढरपूर प्रांत कार्यालयाने (जावक क्र.एम.ए.जी./एस.आर.२०५/२०१६) वितरित केला असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात या जावक क्रमांकाने ज्योती जाणकर यांना दाखला दिला गेलाच नाही. या जावक क्रमांकावर खर्डी (ता.पंढरपुर) येथील प्रशांत नारायण रणदिवे यांना दाखला दिलेला आहे. ज्योती उत्तम जाणकर यांनी जात पडताळणी समितीकडे दाखल केलेला दाखला आम्ही निर्गमित केलेला नाही, असा लेखी अभिप्रायही पंढरपूर प्रांत कार्यालयाने पडताळणी समितीला कळवलेला आहे. त्यामुळे ज्योती जाणकर यांचा दाखला बोगस असल्याचे उघड झाले. 
 
उत्तम शिवदास जाणकर माळशिरस विधानसभा लढवण्यासाठी हिंदू-खाटीक जातीचा दाखला काढला होता. त्यांनी काढलेला हिंदू-खाटीक या जातीचा दाखला तत्कालीन समितीने अमान्य करून तो दाखला २४ मार्च २०१४ रोजी अवैध ठरवला होता.ज्योती जाणकर यांनी आपल्या वडिलांच्या दाखल्याबद्दलची ही माहिती जात पडताळणी समितीपासून जाणूनबुजून दडवून ठेवली. अपूर्ण माहिती देवून खोटे शपथपत्र दाखल करून खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे हिंदू खाटीक या जातीचा दावा केला आहे,अशा शब्दात समितीने ताशेरे ओढले आहेत.
बातम्या आणखी आहेत...