आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलमाडी गटात चैतन्य, पुण्याची राजकीय समिकरणे बदलणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून तिहार तुरुंगाचा ‘पाहुणचार’ घेत असलेले पुण्याचे कॉँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुण्यातील कॉँग्रेसच्या विशेषत: कलमाडी गटात उत्साहाचे वातावरण आहे.
निवडणुकीत कलमाडींच्या सक्रिय सहभागामुळे पुण्यातील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत असून या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष राष्ट्रवादीसह विरोधकांनीही सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते. असे असले तरी घोटाळ्यात अडकल्याने कलमाडी यांना काँग्रेसने निलंबित केले असल्याने त्यांची पुढील भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर आणि शहर काँग्रेसवर जबरदस्त पकड होती. किंबहुना कलमाडींचा एकछत्री कारभार हेच पुण्याच्या काँग्रेसचे रूप होते. मात्र, राष्ट्रकुल घोटाळ्यात 90 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्याने कलमाडींना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आणि पुण्यातील कॉँग्रेस दुबळी झाली. कलमाडी यांच्यासारखी पक्षावर पकड ठेवण्यात एकाही नेत्याला यश आले नाही. त्यामुळे शहर काँग्रेस गटा-तटात विभागली गेली.
कार्यकर्ते आणि समर्थकांची पांगापांग झाली. या अवस्थेत काहींनी स्वयंघोषित नेतृत्वाचा पुकारा करून पाहिला, पण ते प्रयत्नही अपयशी ठरले. तेव्हा सामूहिक नेतृत्वाचा पर्याय ठेवण्यात आला तरीही शहर काँग्रेसच्या गोटातील चिंतेचे वातावरण कायमच होते. कलमाडींच्या अनुपस्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादीने वाढविलेली ‘दादा’गिरी काँग्रेससाठी त्रासदायक ठरत होती.

‘भाई’गिरी चालेल काय?
या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या कॉँग्रेसजनांना कलमाडींच्या सुटकेमुळे बळ आल्याचे बोलले जाते. त्यांच्या जामिनाचे वृत्त कळताच ‘संकटमोचन’च मिळाल्याच्या आविर्भावात कलमाडी समर्थक वावरत होते. असे असले तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तब्बल नऊ महिने तुरुंगाची हवा चाखलेले, पक्षाने निलंबित केलेले कलमाडी जनमानसात पुन्हा ‘भाई’गिरीचे पर्व सुरू करण्यात यशस्वी होणार का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. तर पक्षांतर्गत कलमाडी यांचे विरोधक मानले जाणारे मोहन जोशी, उल्हास पवार, पतंगराव कदम, बाळासाहेब शिवरकर यांचे पुण्यातील राजकीय महत्त्व कमी होण्याची चिन्हे आहेत.

आतषबाजी, मिरवणूक
भाई सुटणार असल्याचा आनंद त्यांच्या समर्थकांनी रॅली काढून जोरदारपणे साजरा केला. पक्षाचे झेंडे घेऊन, फटाके फोडून आणि कॉँग्रेस भवनसमोर आतषबाजी करून समर्थकांनी कलमाडींच्या मागे आपण असल्याचे चित्र दाखवले. दुचाकींवरून कलमाडी समर्थकांनी शहरातील रस्त्यांवर मिरवणुका काढल्या, घोषणाबाजीही केली.