आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैयाने ठणकावले: एक संस्कृती, एक धर्म चालू देणार नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘संविधानाने दिलेले अधिकार मागितल्यावर तुमची घाबरगुंडी का उडते? तुम्ही आज भारतमातेचे चित्र बदलले. वेळीच आवर घातला नाही तर हे उद्या देशाचा झेंडासुद्धा बदलतील. एक संस्कृती आणि एका धर्माचे राज्य या देशात चालू शकत नाही,’ असा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी पुण्यात माेदी सरकारला दिला.

‘देशात यापुढे अनेक ‘रोहित’ तयार होतील; पण ते आत्महत्या करणार नाहीत. मला कोर्टात मारा, रेल्वेत मारा, विमानात मारा. पण मला तुम्ही घाबरवू शकत नाही. शोषितांची लढाई मी लढतच राहीन,’ असेही त्याने खडसावले.

पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीतर्फे आयोजित संविधान परिषदेत तो बोलत होता. ‘प्रक्षोभक भाषणे करून निवडणूक जिंकणे हा आमचा धंदा नाही,’ असे कन्हैया म्हणाला. ‘सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या आईची चर्चा सुरू केली. नंतर गोमाता बाहेर काढली. आता भारतमाता. पुढच्या वर्षी तुम्ही कोणती माता काढणार कुणास ठाऊक?’ असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. मानवतेचे मुद्दे काढले की तुम्ही राष्ट्रवादाचा विषय काढता. देशाने तुम्हाला विकास करण्यासाठी संसदेत पाठवले आहे; राष्ट्रवादाची व्याख्या करत बसायला नव्हे,’ असे कन्हैयाने सुनावले.

"तुम्ही चहावाल्याचा मुलगा आहात. तुम्ही गरीब घरातून आला आहात. मग देशात ‘केजी ते पीजी’ शिक्षण मोफत करून टाका. पण तुम्ही असे करणार नाही. कारण शिक्षणाचे बजेटच तुम्ही कमी केले. वृत्तपत्रांमध्ये स्वतःच्या थोबाडाच्या पान-पान जाहिराती द्यायला, एक-एक तास ‘मन की बात’ करायला किती खर्च होत असेल? हाच खर्च शिक्षणावर करा,' असा सल्लाही कन्हैयाने माेदींचे नाव घेता दिला.

‘हमारा अंगूठा सिर्फ कमल या हाथ के आगे का बटन दबाने के लिए नहीं है,’ असे सांगून कन्हैया म्हणाला, ‘आमचा अंगठा संघर्षाची मूठ आवळण्यासाठीसुद्धा आहे. पंतप्रधान ५६ इंची छाती जगाला दाखवतात. त्यांनी जमिनीवर उतरून जनतेशी बोलावे. शोषण, गरिबी, जातीयवाद या देशाला नवा नाही. पण म्हणून त्याच्या विरोधात लढायचेच नाही का? आमची जात, भाषा कोणतीही असली तरी आम्हाला प्रत्येकाला पोट आहे. मोदींशी व्यक्तिगत वैर नाही. पण तुम्ही गरीब, बेरोजगार, कामगारांना त्यांचे हक्क देणार नसाल तर आमच्या हक्काची लढाई रस्त्यावरच होईल,’ असा इशाराही त्याने दिला.

‘जुमलेबाज’ पंतप्रधान
‘मोदी सरकार जुमलेबाज आहे. हे सरकार फोटोशॉपचे आहे. शिक्षण आणि पोलिसांचेही कंत्राटीकरण तुम्ही केले. मग संसदेचाही ठेका देऊन टाका. धोरणे चांगली असती तर जुमलेबाज पंतप्रधान झाला नसता. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या संसाधनांच्या समान वितरणाचे राजकारण आम्हाला करायचे आहे. जातिअंताची लढाई आम्ही लढतो आहोत.’

‘बुजुर्ग’ अामदार जितेंद्र आव्हाडांना फटकारले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यासपीठावर बसायचा प्रयत्न केला. मात्र त्यांना खुर्ची देण्यात आली नाही. त्यांना श्रोत्यांमध्ये बसावे लागले. याचा संदर्भ घेत कन्हैया म्हणाले, ‘तमाम बुजुर्गांना सांगू इच्छितो की तुमचे मार्गदर्शन जरूर घेऊ. मात्र तुमच्या इशाऱ्यावर आम्ही काम करणार नाही. व्यासपीठाला राजकीय रंग देऊ नका. आमच्यासोबत राजकीय नेते नकोतच. आमची संघटना फक्त विद्यार्थ्यांची आहे.’ शनिवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर अाव्हाड यांनी कन्हैयाला अापल्या गाडीत बसवून अक्षरश: ‘पळवून’ नेले हाेते. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थी कार्यकर्त्यांना त्याच्याशी संवाद साधता अाला नव्हता.
पुढील स्लाइडवर पाहा, कन्हैयाच्या सभेला अशी अलोट गर्दी जमली होती.... वरिष्ठ पोलिस अधिकारी होते बंदोबस्ताला...