आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैय्याची 23 एप्रिलला मुंबईत तर 24 ला पुण्यात जाहीर सभा, संविधान बचाव परिषद’ घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे- दिल्लीतील'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या नागपूरपाठोपाठ पुणे मुंबईतही सभा होणार आहेत. 23 एप्रिल रोजी मुंबईत तर 24 रोजी पुण्यात या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात राष्ट्रीय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचीही कन्हैया भेट घेणार असल्याचे एआरएसएफ संघटनेच्या पंकज चव्हाण याने सांगितले. दरम्यान, या दोन्ही शहरांत अभविप, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मात्र कन्हैयाच्या सभेला विरोध केला असल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून कन्हैया कुमारने नागपुरात छोटेखानी सभा घेतली. त्या वेळी अभाविपच्या कार्यकर्त्याने विरोध करत कन्हैयाच्या दिशेने जोडा भिरकावला होता. यावर कन्हैयाने पुढच्या वेळी दुसरा जोडाही मार असे आव्हान दिले होते.
पुण्यात ‘रोहित वेमुला अ‍ॅक्ट आणि संविधान बचाव परिषद’ घेणार-
पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीच्यावतीने 24 एप्रिल रोजी ‘रोहित वेमुला अ‍ॅक्ट आणि संविधान बचाव परिषद’ होणार आहे. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमार याची जाहीर सभा होणार आहे. कन्हैय्याकुमारच्या भाषणाला विरोध केल्यास विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. शहरातील विविध विद्यार्थी पक्ष-संघटनांनी एकत्र येऊन पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समिती स्थापन केली आहे.
पुण्यातील परिषद ही प्रबोधनाचा महाजागर असणार आहे. सध्या भारतीय राज्य घटनेसंबंधी नको तसे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर 'समाजाला अभिप्रेत असणारा भारत' विषयावर कन्हैय्याकुमार बोलणार आहे. देशातील तरुणाईसह सर्वसामान्य नागरिक, गोरगरिब, शोषित जनतेचा दबलेला आवाज कन्हैय्याकुमार मांडत असल्याने त्याला विरोध होत आहे, असे पंकज चव्हाण यांनी सांगितले.
शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असणारा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. कुणाला विरोध करण्यासाठी कन्हैय्याकुमारला पुण्यात बोलवले नाही. पण कन्हैय्याला कुणी विरोध केल्यास विरोध करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे संतोष शिंदे यांनी सांगितले.
नागपूरमध्ये कन्हैय्याकुमारची सभा झाली. त्याअगोदर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन देखील त्यांच्यावर कारवाई केली नाही. सरकार अशा अपप्रवृत्तींना पाठीशी घालत आहे, असा आरोप गिरीष फोंडे यांनी केला आहे. आम्हाला अपप्रवृत्तींकडून विरोध होतो म्हणजे आमचा मार्ग योग्य आहे. मात्र, विरोध करणारे खालच्या पातळीवर गेले असून त्यांची चप्पल, दगड फेकण्याची अपप्रवृत्ती आहे, असेही फोंडे म्हणाले.
कन्हैय्याकुमारच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची
कन्हैय्याकुमार पुण्यात येण्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चाने धमकी दिल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज होती. त्यामुळे आता कन्हैय्याकुमार पुण्यात आल्यानंतर त्याला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण पुरविण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची आहे, असे गिरीष फोंडे यांनी सांगितले.
कन्हैय्याकुमार FTIIच्या विद्यार्थ्यांना भेटणार-
भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या झालेल्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी प्रखर विरोध केला होता. त्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे गजेंद्र चव्हाण यांची निवड देशपातळीवर चर्चेचा विषय बनला. कन्हैय्याकुमार 24 एप्रिल रोजी एफटीआयआयमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे.
राज्यभर जाहीर सभा घेणार-
युवक क्रांती दलाचे (युक्रांद) अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही गांधी भवन येथे कन्हैयाकुमारची सभा व तरूणासोबत संवादाचा कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले आहे. कन्हैया कुमारला पुण्यासोबतच मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांतूनही संवादासाठी निमंत्रित केले आहे. या सर्व ठिकाणी आपण जाणार असल्याचे कन्हैयाने स्पष्ट केले असले तरी त्याबाबतचे त्याचे वेळापत्रक उपलब्ध झाले नाही. मात्र, 24 एप्रिल रोजी तो पुण्यात असणार आहे.