आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय प्रश्न हाताळण्याची पद्धत चुकते आहे का? माजी गृहसचिव माधव गोडबोलेंचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय\' या माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक लिखित पुस्तक प्रकाशनावेळी, (डावीकडून) शैलेश वाडेकर , संजय नहार , मलिक, माधव गोडबोले, अभय फिरोदिया, प्रशांत तळणीकर. - Divya Marathi
\'कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय\' या माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक लिखित पुस्तक प्रकाशनावेळी, (डावीकडून) शैलेश वाडेकर , संजय नहार , मलिक, माधव गोडबोले, अभय फिरोदिया, प्रशांत तळणीकर.
पुणे- राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात का? तुम्ही राष्ट्रवादी आहात काय असे प्रश्न विचारले जाणं हे गंभीर आहे. राष्ट्रीय प्रश्नांची हाताळणी करण्याची पद्धत चुकते आहे का ? असा सवाल माजी गृहसचिव माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.
 
चिनार पब्लिशर्स आणि सरहद प्रकाशित 'कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय' या माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक लिखित आणि प्रशांत तळणीकर अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी वेदप्रकाश मलिक, प्रसिद्ध उद्योगपती अभय फिरोदिया, सरहद चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, प्रशांत तळणीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
गोडबोले म्हणाले, '' लोकशाहीत लोकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. पण काश्मीरमध्ये लोक मतदानावरच बहिष्कार टाकत असतील, तर याबाबत विचार व्हायला हवा. संवादाने प्रश्न सुटू शकतात. काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तरीही आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू शकत नाही, ही बाब दुर्दैवाची आहे. हा प्रश्न सोडविण्याच्या बाजूने संवाद होण्याची गरज आहे. पाकिस्तानशी न बोलणं हे उत्तर असू शकत नाही. दोन देशात संवाद होणं खूप आवश्यक आहे"
काश्मीर मधील परिस्थिती चिघळली की ती नियंत्रणात आणणे हे लष्कराचे काम आहे, काश्मीर प्रश्नावरचे उत्तर म्हणून लष्कराकडे पाहिले जाऊ नये, असे सांगून लष्कराची भूमिका नेमकी काय आहे, ते निश्चित करायला हवे, असेही गोडबोले यांनी सांगितले.
 
मलिक म्हणाले, "राष्ट्रीय सुरक्षेला गृहीत धरले जाता कामा नये. आजूबाजूला खूप गोष्टी घडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने तयार असलं पाहिजे. संरक्षण क्षेत्रातील बजेट दिवसेंदिवस वाढत आहे. या बजेटची तपासणी कॅग कडून केली जाते. ही तपासणी होण्याबरोबर संरक्षण क्षेत्रातील आपल्या क्षमतेचंही 'ऑडिट' झालं पाहिजे."
 
फिरोदिया म्हणाले, "पाकिस्तानला लोकशाही देश म्हणून संबोधून आपण मोठी चूक करत आहोत. जगात केवळ भारत हाच खराखुरा लोकशाही देश आहे. पाकिस्तान समोर भारताने सामाजिक आणि राजकीय धाक निर्माण केला पाहिजे. लष्करी आणि आर्थिक बाजूनेही बलवान होऊन हा धाक अधिक बळकट केला पाहिजे"
 
देशभक्ती या विषयावर आपल्या भावना प्रामाणिक असतात, पण त्या योग्यही असल्या पाहिजेत. आपल्या भावना व्यक्त करताना लष्करासमोरील अडचणी वाढणार नाही, तर त्यांना मदत होईल, या बाजूनं आपण काम केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. जी पुस्तके या बाजूने जाणीव जागृती निर्माण करतात, ती पुस्तके वाचकांसमोर आणण्याच्या प्रयत्नांतला एक भाग म्हणजे मलिक यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद होय, असे संजय नहार यांनी सांगितले. युद्ध म्हणजे काय, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाबद्दलच्या आपल्या कल्पना दुरुस्त करण्यासाठी मलिक यांचे पुस्तक वाचायला हवे, असे तळणीकर यांनी सांगितले.
 
कारगिल युद्धाचा इतिहास मांडणारे पुस्तक!-
 
भारताचे पाकिस्तानशी झालेले युद्ध असो किंवा चीनशी झाले युद्ध असो, हा युद्धाचा नेमका इतिहास कधीही वाचकांसमोर आला नाही. युद्धात काय चुकले, काय योग्य केले, या गोष्टी जगासमोर उघड व्हायला हव्यात. कारगिल युद्धाचा इतिहास म्हणून मलिक यांच्या 'कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय' या पुस्तकाचे मोल फार आहे, असे मलिक यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...