आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन खाते, प्रशासनाचा पराक्रम: म्हणे, कार्ल्याच्या एकविरा देवीचे प्राचीन मंदिर अनधिकृत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या कार्ल्याच्या एकविरा देवीचे प्राचीन मंदिर अनधिकृत धार्मिक स्थळ असल्याचे वन खात्याने सांगितल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. वन खात्याने दिलेल्या अहवालानुसार मावळचे तहसीलदार शरद पाटील यांनीही प्राचीन एकविरा मंदिराच्या नावाचा समावेश अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत समावेश केल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी वन खाते व प्रशासनाने जाहीर माफी मागावी तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान अधिकृत असल्याची घोषणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाविकांनी दिला आहे.
मावळ तालुक्यातील जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकवीरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते. इंग्रजांच्या 1857 च्या गॅझेटमध्ये देखील या मंदिराचा उल्लेख आहे. मंदिरावर असलेल्या एका शिलालेखात शालिवाहन शके 1788 चा उल्लेख आहे. याचाच अर्थ हे मंदिर खूप जुने आहे. हे मंदिर अनधिकृत असल्याचा जावईशोध तालुका प्रशासनाने कसा लावला, असा संतप्त सवाल एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सेवेकरी, भाविक आणि परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
प्राचीन एकविरा मंदिराच्या नावाचा समावेश अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत झाल्याचे माहिती बाहेर आली आणि एकच गदारोळ उठला. त्यानंतर मावळ तालुका प्रशासनाने मात्र सारवासारवीची भूमिका घेतली. वन विभागाकडून प्राप्त झालेल्या यादीत एकविरा मंदिराचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मावळचे तहसीलदार शरद पाटील हे परगावी असल्याने ते स्वतः भेटू शकले नाहीत, मात्र नायब तहसीलदार राजकुमार गबाले यांनी या सर्वेक्षणासाठी कोणतेही निकष नसल्याचे कबूल केले. वेहेरगाव ग्रामपंचायतीने यासंदर्भात ग्रामसभा बोलावली आहे. ग्रामस्थांनी देखील या प्रकाराचा निषेध केला असून सरपंच संतोष रसाळ यांनी देखील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...