पुणे - देशभरात फक्त काश्मीरची खासियत मानले जाणारे केशर लवकरच राज्यातही उत्पादित होण्याची अाशा निर्माण झाली आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांच्या गटाने प्रयोगशाळेतील हरितगृहात केशराच्या लागवडीचा आणि उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. सी. के. जैन यांनी ही माहिती दिली.
‘काश्मीरमधील थंड हवेत रुजणारे केशर आता अन्यत्रही रुजवता येणार आहे. प्रयोगशाळेतील केशर उत्पादनाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. सध्या केशर उत्पादनासाठी आवश्यक असणारी विशिष्ट माती आणि थंड हवा व थंड पाणी यासह हरितगृहाच्या उभारणीचा खर्च कमी कसा करता येईल, यावर संशोधन सुरू झाले आहे,’ असे डॉ. जॉन यांनी सांगितले. ‘एनसीएलमध्ये काश्मिरी माती मिळवून प्रयोग करण्यात आले. त्यातून काश्मिरी मातीचे गुणधर्म असणारी खास माती प्रयोगशाळेत तयार करण्यात आली. सर्वसाधारणपणे उणे २ ते ५ इतक्या थंड हवामानात केशर रुजते आणि उत्तम उत्पादन देते; पण जिथे थंडीत तापमान ८ ते १० अंश आणि उन्हाळ्यात तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान असते, अशा ठिकाणीही केशराचे उत्पादन आता या प्रयोगामुळे शक्य होणार आहे. अर्थात हे प्रायोगिक तत्त्वावरील यश आहे. यातून प्रत्यक्ष उत्पादनासाठी काळ जावा लागेल आणि ती प्रक्रिया गुंतागुंतीची असू शकते. पण काश्मीरव्यतिरिक्त प्रदेशातही केशर उत्पादन शक्यतेच्या कोटीत आहे, हे सिद्ध झाले आहे,’ असे डॉ. जाॅन यांनी स्पष्ट केले.
- केशराचे कंद जुलै-ऑगस्टमध्ये लावले जातात
- पहिल्या, दुसऱ्या वर्षापासून फुले येऊ लागतात
- तिसऱ्या वर्षानंतरची फुलेच सर्वोत्तम केशर देतात
- केशर कंदाची वाढ उत्तम होते.
-एका कंदापासून ७ ते १० वर्षे उत्पादन मिळू शकते.
- कंदांची गर्दी होऊन काही रोपे नव्या जागी लावावी लागतात.
अतिथंड पाणी मुळाशी
-एनसीएलमधील शास्त्रज्ञांच्या गटाने आधी काश्मिरी मातीचा अभ्यास केला. या मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म अभ्यासून त्याजवळ जाणारे ‘प्लँटिंग मटेरियल’ तयार करण्यात यश मिळवले. कंदांना थंडावा देणारे वातावरण हरितगृहात तयार केले. केशराला अतिथंड पाण्याची गरज लागते. असे पाणी फक्त मुळापाशी देण्याची व्यवस्था केली. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सध्या प्लँटिंग मटेरियल आणि हरितगृह यावर सखोल संशोधन सुरू केले आहे.
-डॉ. सी. के. जॉन, शास्त्रज्ञ, एनसीएल