पुणे - राजकारण सोडल्यानंतर उरलेले सर्व आयुष्य विपश्यनेत बुडवून टाकण्याची इच्छा आम आदमी पार्टीचे (
आप) सर्वेसर्वा अरविंद
केजरीवाल यांनी साेमवारी पुण्यात व्यक्त केली. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडण्याची भलीमोठी चूक केल्यानंतर आजच्या वक्तव्यातूनही आणखी एका नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर मात्र
केजरीवाल यांनी तातडीने सावरून घेतले. ‘राजकारण सोडण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही. दिल्लीच्या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहे,’ असे सांगत त्यांनी आपली बाजू मांडली. दिल्ली जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेसची धामधूम सुरू झाली असताना केजरीवाल आठवडाभर पुण्यात मुक्काम ठोकून होते. हे पूर्ण सात दिवस मौन पाळून त्यांनी विपश्यना केली.
‘दिल्ली विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असतानाही मी येथे विपश्यना करतोय. यावरूनच विपश्यनेचे माझ्या आयुष्यातील स्थान तुमच्या लक्षात येईल,’ असे केजरीवाल म्हणाले. सोमवारी मौन सोडल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचे उत्तर केजरीवाल यांनी एका प्रश्नाला दिले. अण्णांबरोबरच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली नसल्याचेच या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
सत्तेत आल्यानंतर दिल्लीकरांना पुन्हा मोफत पाणी आणि निम्म्या किमतीत वीज देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. ‘आप’ सत्तेत आल्यास दिल्लीतील महागाई पुन्हा कमी होईल, लाचखोरीला आळा बसेल, असा दावाही त्यांनी केला. दिल्लीच्या विकासासाठी ‘दिल्ली डायलॉग' ही ‘आप'ची ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध केली जाणार आहे. बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी तेथे नवी २० महाविद्यालये सुरू करण्याचे आणि युवकांसाठी लाख नोकर्यांचे आश्वासन यात असेल, असे ते म्हणाले.
‘आप’लेपणा अजूनही कायम
अनेकनेते-कार्यकर्ते ‘आप’पासून दुरावले आहेत का, या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, ‘पद, पैसा, प्रतिष्ठा, तिकीट यांच्या आशेने येणारे लोक दूर गेले असतील. प्रत्यक्षात जनतेचे समर्थन कमी झालेले नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत ३० हजार नवे कार्यकर्ते ‘आप’शी जोडले गेले आहेत,’ असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार आणि राजकारणातील अनिष्ट प्रथांविरुद्धची स्वच्छता मोहीम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लढाई मोदींशी नाही
‘राजकीयआडाखे चुकल्याने दिल्लीची सत्ता गमावण्याची गफलत घडली. या वेळी मात्र ‘आप’ स्वबळावर दिल्लीत सरकार स्थापन करेल. आमची लढाई भाजप-काँग्रेस या पक्षांविरोधात नाही.
नरेंद्र मोदींसारख्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधातही आमचा संघर्ष नाही. भ्रष्टाचार आणि महागाईविरुद्ध आमचा लढा असेल.’ अरविंदकेजरीवाल
१७ वर्षांत २३ वेळा विपश्यना
आयआयटीमधूनइंजिनिअरिंगचे शिक्षण, त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधली उच्च पदाची नोकरी, सामाजिक कार्यातील सहभाग, ‘अण्णा आंदोलन' आणि ‘आप’च्या रूपाने सक्रिय राजकारणात घेतलेली उडी या प्रवासात अनेक ताणतणाव आले. माझ्याविरुद्ध षड्यंत्रे रचली गेली. विपश्यनेची साथ मला मिळाली नसती तर मी हे सगळे सहन करू शकलो नसतो, असे केजरीवाल म्हणाले. १९९७ पासून गेल्या १७ वर्षांत २३ वेळा विपश्यनेचे कोर्स केल्याचेही त्यांनी नमूद केले.