आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidney Selling Buying Racket In Rubi, RTI Activist Borhate Claimed

‘रुबी’त किडनीच्या खरेदी-विक्रीचे रॅकेट, आरटीआय कार्यकर्ते ब-हाटेंचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील प्रसिद्ध रुबी रुग्णालयात श्रीमंत रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून गरीब लोकांच्या किडन्या काढण्याचे रॅकेट सर्रास चालवले जात आहे. एजंटांमार्फत हा धंदा राजरोस सुरू असल्याचा गौप्यस्फोट माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र ब-हाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र या आरोपाचे खंडन केले आहे.


ब-हाटे यांनी रुग्णालयावर आरोप करताना पुराव्यादाखल एक साक्षीदारही पत्रकारांसमोर हजर केला. सुलेमान सदरुद्दीन नरसिंगानी याने ‘रुबी’त आलेले अनुभव पत्रकारांसमोर कथन केले. सुलेमान म्हणाला, ‘माझे चुलतमामा सुलतान हुसेन हे अमेरिकेतून पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे 18 डिसेंबर 2002 रोजी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले होते. त्यांना किडनीची गरज होती. त्या वेळी ‘रुबी’तील डॉक्टरांनी सल्ला दिला की, तुमची जर खर्च करण्याची तयारी असेल तर आम्ही एजंटांमार्फत किडनी उपलब्ध करून देतो. मात्र, त्यासाठी तुमचा एखादा नातेवाईक रुग्णालयात दाखल केल्याचे आपल्याला दाखवावे लागेल.


मृत वडिलांचे संमतिपत्र दाखल
‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रत्यक्षात माझी किडनी न काढता एक भिकारी आणून त्याच्या किडनीचे मामांना प्रत्यारोपण करण्यात आले. कागदोपत्री मात्र माझीच किडनी काढल्याचे दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर यापूर्वीच मृत झालेल्या माझ्या वडिलांचे ना हरकत प्रमाणपत्रही रुग्णालयाने तयार केले,’ अशी माहिती सुलेमानने पत्रकारांना दिली.


कर्मचा-यांकडून धमकी
‘या गैरप्रकाराला विरोध करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार उघड केल्यास खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी रुबी हॉलच्या कामगार संघटनेच्या लोकांनी मला दिली होती. त्यामुळे आजवर या प्रकरणाची वाच्यता केली नाही,’ असेही सुलेमानने स्पष्ट केले.


पोलिसांत तक्रार
‘रुबी’तील या रॅकेटप्रकरणी कोरेगाव पोलिस चौकीत संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर व कामगार संघटना पदाधिकारी यांच्याविरोधात लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब-हाटे यांनी केली.


आरोपांमध्ये तथ्य नाही : डॉ. सर्दे
‘रुबी’च्या किडनी प्रत्यारोपण विभागाचे डॉ. ए. डी. सर्दे म्हणाले, किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी पेशंटचे नातेवाईकच ‘डोनर’ शोधून आणतात. हे काम रुग्णालयाचे नसते. प्रत्यारोपणास संमती असल्याचे प्रतिज्ञापत्रही नातेवाईक देतात. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शासनाने नेमलेल्या एका विशेष समितीचीही परवानगी घेणे बंधनकारक असते. ब-हाटे व नरसिंगानी यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. रुबी रुग्णालयाची कागदपत्रे कोणीही येऊन तपासू शकतो.