आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kirit Somayya Commented On NCP And Congress Leaders Corruption

अजित पवार, तटकरे, अशोक चव्हाणांची यंदाची दिवाळी भुजबळांसमवेत तुरुंगात- सोमय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची 2016 ची दिवाळी गजाआड छगन भुजबळांसमवेत जाणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मॅपल कंपनीने ग्राहकांची फसवणूक केली असून हा चिटफंड घोटाळा आहे. त्यामुळे मॅपलचा बिल्डर सचिन आग्रवाल यालाही लवकरच अटक होईल असेही सोमय्या यांनी सांगितले.
पुढच्या महिन्यापासून अजित पवारांविरोधात कारवाई सुरू होणार असून, पाठोपाठ सुनील तटकरे यांचीही चौकशी सुरू होईल. महिनाभरात या दोघांविरोधात आरोपपत्र फाइल होईल, असे सोमय्या म्हणाले. भाजपतर्फे आयोजित 'भ्रष्टाचाराविरोधात लढा' व्याख्यानात ते बोलत होते.
मातंग समाजासाठी असलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा निधी राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याने अजित पवारांच्या आदेशाने हडप केला. पवारांच्या सांगण्यावरून महामंडळाचे 17 कोटी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना विधानसभा निवडणुकीसाठी देण्यात आले. मातंगांसाठी असलेल्या महामंडळाच्या निधीतून राष्ट्रवादीच्या 64 पदाधिकाऱ्यांनी आलिशान वाहने स्वतःच्या घरी नेली, असा आरोप सोमय्या यांनी केला. आर्थिक आणि हिंसक दहशतवादापासून देशाची सुटका करण्याचे भाजपचे ध्येय आहे, असे सोमय्या म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे घोटाळेबहाद्दरांचे होते. मोदी-फडणवीसांचे सरकार घोटाळे बहाद्दरांविरोधात कारवाई करणारे आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यात-देशात एकही घोटाळा झाला नाही. कारण हे सरकार पारदर्शकतेचा आग्रह धरणारे आहे.

सोमय्या म्हणाले, 'जीएसटी' विधेयक केवळ काँग्रेसच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडले आहे. इतर सर्व पक्षांचा याला पाठिंबा आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात काँग्रेसला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न सरकार करेल. त्यांनी ऐकले तर ठीक, अन्यथा राज्यसभेच्या पुढच्या निवडणुकीपर्यंत आणखी दीड-दोन वर्षे थांबावे लागेल. शिक्षणसम्राटांच्या भ्रष्टाचाराचा विषय आगामी काळात हाती घेणार असल्याचे सोमय्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ पुन्हा गजाआड-
खोटे प्रमाणपत्र सादर करून आयसीयूत दाखल झालेले छगन भुजबळ यांची रवानगी दोन-तीन दिवसांत परत आर्थर कारागृहात होणार. त्यांना काही झालेले नाही. त्यांची तब्येत चांगली आहे. महाराष्ट्राची जेवढी लूट केली तेवढी वर्षे त्यांना गजाआड राहावे लागणार आहे, असा दावाही सोमय्या यांनी केला.
पुढे वाचा, सोमय्या म्हणाले, गुंतवणूकदार व ग्राहकांसाठी आणणार अॅप...