पुणे/कोल्हापूर- एका सहीसाठी 16 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे
आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच सोमवारी माळवी या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. तसेच अटक टाळण्यासाठी शनिवारी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी सांगितले.
माळवी यांना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासगी स्वीय सहायकामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. महिलेला रात्री कस्टडीमध्ये ठेवण्यासाठी कायदेशीर अडचण असल्याने त्यांना गरज भासेल तेव्हा येण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तृप्ती माळवी यांची अटक टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रकृती बिघडल्याचे कारण पुढे करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच माळवी यांना अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, महापौरांचे पीए अश्विन गडकरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तृप्ती माळवी यांच्या सांगण्यावरूनच लाच मागितल्याचे गडकरी याने एसीबीला सांगितले. त्यामुळे तृप्ती माळवी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2014 मध्ये कोल्हापूरच्या 41व्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तृप्ती माळवी यांची बिनविरोध निवड झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा काय आहे प्रकरण?