आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Water For The Marathwada Become Daydream, Impossible To Move Water

मराठवाड्यासाठी कृष्णेचे पाणी ठरणार मृगजळच,पाणी वळवणे अशक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कृष्णा खो-याचे पाणी मराठवाड्याला मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. कृष्णा खोरे पाणीवाटप लवादाचा अंतिम निवाडा नुकताच जाहीर झाला असून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ब्रजेशकुमार अध्यक्ष असलेल्या या लवादाने एका नदीच्या खो-यातील पाणी दुस-या नदीच्या खो-यात वळवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे कृष्णेतील पाणी उचलून ते नीरा-भीमा नदीच्या मार्गाने मराठवाड्यात नेण्याच्या मार्गात आडकाठी आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात असलेले खो-यातील अतिरिक्त पाणी भीमा नदीतून मराठवाड्याच्या आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये वळवण्याचे स्वप्न गेल्या दहा वर्षांपासून दाखवले जात होते. या महत्त्वाकांक्षी स्वप्नाला ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना’ असे नाव देण्यात आले. मात्र लवादाच्या निर्णयामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पच पूर्णत: गोत्यात आला आहे.
लवादाचा विरोध का? कृष्णा खो-यातील पाण्यामुळे प. महाराष्ट्रातील 18 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात उसासारख्या पिकामुळे फक्त 8 लाख हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आले. यावर लवादाने आक्षेप घेत मिळालेल्या पाण्याचा विनियोग योग्य प्रकारे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाण्याच्या संभाव्य उपलब्धतेबाबत लवादाने शंका व्यक्त केली. सरासरी चार वर्षांतून एकदा अतिवृष्टी होते आणि कृष्णा खो-यात अतिरिक्त पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. दरवर्षी पाणी मिळण्याची शाश्वती नसताना एका खो-यातून दुस-या खो-यात पाणी वळवण्यासाठी प्रचंड खर्च करणे अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले गेले.
ब्रजेशकुमार लवाद
कृष्णा नदीतील पाण्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात वाद होता. यासाठी 2004 मध्ये ब्रजेशकुमार लवाद नेमण्यात आला. या लवादाने पन्नास वर्षांची आकडेवारी अभ्यासून कृष्णा खो-यात 2578 टीएमसी पाणी असल्याचे निश्चित केले. यापैकी 666 टीएमसी पाणी महाराष्ट्राला, 907 टीएमसी कर्नाटकला आणि 1005 टीएमसी पाणी आंध्र प्रदेशला देण्यात यावे असा निर्णय लवादाने घेतला आहे.